सातारा प्रतिनिधी । सध्या फलटणमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून नाव न घेता भाजप खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला जात आहे. दरम्यान, त्यांनी नुकतीच एक टीका केली असून त्यांच्या या टीकेची चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. “फलटणला शिवाजीराजेंनी जमिनी दिल्या आहेत. आणि अनेकजण त्या बळकावू पाहत आहे. या तालुक्यात त्याची एवढी दहशत आहे की, तेवढी छोट्या राजनची ही नव्हती. हा सहा फुटांचा छोटा राजनच आहे, असा आरोप आरोप करत रामराजेंनी खा. रणजीतसिंह निंबाळकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
माजी सभापती रामराजेंनी नुकतीच एका कार्यक्रमास उपस्थिती लावली. यावेळी ते म्हणाले की, ‘फलटणला शिवाजीराजेंनी जमिनी दिल्या. माझ्या आजोबांचे संस्थान विलीन झाले. त्यावेळी आमच्या घरात ३७ हजार एकर जमीन होती. ही सगळी कुळाची होती. आम्ही त्यातील एकही जमीन घेतली नाही. नाईक बोमवाडीकरांनो एक लक्षात घ्या, माझ्या नावात ही नाईक आहे. तुम्हाला आम्ही बोंबलून देणार नाही असे आमचे घराणे आहे. पण, त्यांच्या नादी लागला तर बोंबलायलाच लागेल. आमच्या घराचा आणि त्यांचा दोन पिढ्यांचा संबंध होता, तो आता संपला आहे.
स्वत:च्या वडील भावाला खासदाराने इतका मारला की संजीवबाबांच्या घराबाहेर तो रात्रभर बोंबलत होता. संजीवबाबा मला वाचवा, त्यावेळी हा कुठं गेला होता. आम्हाला सांगतात नीट वागा, त्यापेक्षा तुम्हीच नीट वागा ना. यांची केवढी दहशत की छोट्या राजनची एवढी दशहत नव्हती. हा सहा फुटांचा छोटा राजनच आहे, अशी टीका रामराजेंनी केली.
संजीवराजे बाबांना खासदार व्हायला लागेल : रामराजे
आपल्या हातून काही चुका झाल्या असतील तर माझं चुकलं म्हणतो. पण, यांनी खोड्याच काढायचं ठरविलं आहे. आम्ही खोड्या काढत नाही. आम्ही हिंदुत्वाच्या विरोधात नाही. जातीधर्माच्या विरोधात नाही. पण, आमच्या लोकांना त्रास व्हायला लागला तर आम्ही तुम्हाला विरोध करू. ही काळ्या दगडावरील रेघ आहे. त्यासाठी संजीवराजे बाबांना खासदार व्हायला लागेल व याला त्यांची लायकी दाखवावी लागेल. तो सुधारत नाहीतर आम्हाला तरी बिघडवं, असे सांगून माझं वय ७६ आहे, मी कुठं बिघडून कुणाचे कल्याण करू, असा टोलाही लगावला.
आम्हाला जनाची नाही तर मनाची लाज आहे
खासदार हिंदूराव दिलदार माणूस होता. हे खतरुड आहे. हिंदूराव आजारी पडला होता, त्यावेळी नागपूरला आला. दीपकरावांच्या घरी आला होता. त्यांचा मला फोन आला, हिंदूराव निंबाळकरांना हृदयविकाराचा त्रास होत असल्याचा, आम्ही त्यांना तातडीने रुग्णालयात नेले.खासदार निंबाळकर आठवडाभराने आले आणि म्हणतोय बापाचे स्वप्न पूर्ण करायला निघालोय. हे महाशय आठ दिवसांनी आले. आम्ही सगळे केलं का, तर भावकी आहे. त्यांना कशाचीच लाज नाही. पण, आम्हाला जनाची नाही तर मनाची आहे. पण तुम्ही अशा माणसाला खासदार म्हणून निवडून देतात. तुम्ही ही धन्य आहात, असे रामराजे म्हणाले.