सातारा प्रतिनिधी | नरेंद्र मोदी, अमित शहा आम्हाला माहिती नाहीत. आम्ही तेवढे मोठे पण नाही. आमचं देणं घेणं अजितदादांशी आहे, असं सांगत देवेंद्र फडणवीस यांच्या ऐवजी रणजितसिंह निंबाळकरांनाच मुख्यमंत्री करा, अशी खोचक टीका आमदार रामराजे नाईक-निंबाळकरांनी कोळकी (ता. फलटण) येथील मेळाव्यात केली.
मतदान कमी झाल्यास आम्ही जबाबदार नाही
भावनेच्या भरात तुतारी धरु, मशाल धरु, शिट्टी धरु, असं म्हणून चालणार नाही. आम्ही तुमच्याबरोबर राहू, असा शब्द रामराजेंनी कार्यकर्त्यांकडे मागितला. तसेच भविष्याची आखणी करुन दोन दिवसांत निर्णय घेऊ. त्यासाठी आपले नेते अजितदादांकडे शिष्टमंडळ घेऊन जाणार असल्याची घोषणा रामराजे नाईक निंबाळकर यांनी मेळाव्यात केली. रणजितसिंह नाईक निंबाळकर आपलं वागणं बदलणार असतील, माफी मागणार असतील तर ठीक. नाहीतर मतदान कमी झाल्यास आम्ही जबाबदार नाही, असंही रामराजेंनी स्पष्ट केलं.
रणजितसिंह निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध
अजितदादा गटाच्या मेळाव्यात रामराजेंच्या समर्थकांनी रणजितसिंह निंबाळकरांचे काम करणार नाही. वेळप्रसंगी तुतारीचे चिन्ह घेऊन लढा, विजयसिंह मोहिते-पाटील यांना साथीला घेऊन निर्णय घ्या, असे सांगत विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला. तोच धागा पकडून रामराजे म्हणाले, रणजितसिंह निंबाळकरांचा त्रास सातारा जिल्ह्याला आहे. मी सांगितले की आम्हाला सीट बदलून पाहिजे. परंतु, एक लक्षात घ्या. आपण महायुतीचे सदस्य आहोत. तुम्ही गडबड करु नका, भविष्याची आखणी करून निर्णय घेऊ.
आम्ही सत्तेचा माज केला नाही
आमच्या मतांची गरज नसेल तर आपण का म्हणावं की आमची मतं घ्या. भावनेने राजकारण होत नाही. ही निवडणूक शेवटची नव्हे. काय करायचंय ते नेत्यांवर सोपवू. रणजितसिंहांनी सुडाचं राजकारण करू नये. आजपर्यंत बरेच गट असतानाही, सत्ता असतानाही आपण असलं राजकारण केलं नाही. सत्तेचा माज केला नाही. त्या माणसांनं सुडांच राजकारण करणार नाही, दम भरणार नाही, असा शब्द द्यावा. हा उमेदवार नको असं मी श्रेष्ठींना स्पष्ट सांगितले होते. मतदान कमी झालं तर आम्ही जबाबदार नाही. मग काय करायचं ते करा, अशा शब्दांत रामराजेंनी आपला इरादा स्पष्ट केला.