सातारा प्रतिनिधी । काही महिन्यांवर लोकसभेची निवडणूक येथून ठेपलेली आहे. या निवडणुकीची तयारी सध्या सर्वच राजकीय पक्षांकडून केली जात आहे. सर्व पक्षांकडू राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. अशातच राज्यातील नऊ मतदारसंघांबाबत महायुतीतील अजित पवार गटाने आग्रह धरल्यामुळे महायुतीत जागावाटपावरून तिढा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या राष्ट्रवादीच्या असलेल्या चार जागांसह आणखी पाच जागांची अजित पवार गटाने दावा ठोकला आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात अजित पवार गटाच्या एका नेत्याचं नाव सध्या चांगलंच चर्चेत आहे.
सध्या राष्ट्रवादीच्या असलेल्या चार जागांसह आणखी पाच जागांची अजित पवार गटाने दावा ठोकलयामुळे महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गट अस्वस्थ झाला आहे. अजित पवार गटाने बारामती, सातारा, रायगड, शिरूर या आपल्या हक्कांच्या जागांसह धाराशिव, परभणी, दक्षिण मुंबई, भंडारा-गोंदिया आणि छत्रपती संभाजीनगर या जागांसाठी आग्रह धरला आहे. या ठिकाणाहून लोकसभेसाठी निवडणूक लढवणाऱ्या संभाव्य उमेदवारांच्या नावांचीही चर्चा केली जात आहे.
सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. या बालेकिल्ल्यात अजित पवार गटा हा आगामी लोकसभा निवडणुकीत आपला खमका उमेदवार उतरविणार आहे. त्यामध्ये विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.
रामराजे निंबाळकर हे सातारा जिल्ह्यातील फलटणच्या राजघराण्याचे २९ वे वंशज आहेत. त्यांचे जावई राहुल नार्वेकर हे भाजप आमदार आहेत. रामराजे निंबाळकर 1991 मध्ये फलटण पालिकेचे नगराध्यक्ष झाले. 1995 मध्ये सर्वप्रथम ते फलटण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. राज्यातील अपक्ष 22 आमदारांची मोट बांधून त्यांनी शिवसेना नेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या सरकारला पाठिंबा दिला होता.
शरद पवार यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यावेळी रामराजे राष्ट्रवादीसोबत गेले होते. त्यानंतर आघाडी सरकारच्या काळात विलासराव देशमुख मुख्यमंत्रिपदी असताना रामराजेंना महसूल राज्यमंत्रिपद देण्यात आले. 2004 मध्ये त्यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली. साताऱ्याच्या पालकमंत्रिपदाची धुराही देण्यात आली होती. 2013 मध्ये रामराजेंना राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष करण्यात आले. दरम्यान, शरद पवार यांनी २०१० मध्ये रामराजेंना विधान परिषदेवर संधी दिली. सध्या ते उपमुख्यमंत्री अजित पवार गटात असून विधान परिषदेचे माजी सभापती आहेत.
‘हे’ आहेत संभाव्य उमेदवार
1) बारामती – सुनेत्रा पवार
2) सातारा – रामराजे नाईक निंबाळकर
3) रायगड – सुनील तटकरे
4) शिरूर – माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (सध्या शिंदे गटात)
5) दक्षिण मुंबई – काँग्रेसमधील बडा चेहरा
6) परभणी – राजेश विटेकर
7) भंडारा गोंदिया – प्रफुल्ल पटेल
8) धाराशिव – भाजपचा मोठा चेहरा
9) छत्रपती संभाजीनगर – सतीश चव्हाण