सातारा प्रतिनिधी । नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत फलटण मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार दीपक चव्हाण यांचा पराभव झाला. चव्हाण हे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकरांचे समर्थक आहेत. संपूर्ण निवडणुकीत विधानपरिषदेचे माजी सभापती तथा आमदार रामराजे नाईक निंबाळकर हे कुठेच दिसले नाहीत. निकालापासून शांत असलेल्या रामराजेंच्या स्टेट्सची राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यांची नवीन इनिंग कोणत्या पक्षाकडून असणार, याची उत्सुकता त्या स्टेट्समुळे वाढली आहे. आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या व्हॉट्स ॲप स्टेट्सला, ‘झालेल्या चुका मान्य करून आता संघर्षाला सुरुवात. सुरक्षित, आधुनिक, संपन्न सातारा जिल्ह्यासाठी,’ असा मजकूर पोस्ट केलेला आहे.
रामराजेंनी या स्टेट्समधून रामराजे नाईक निंबाळकर यांना काय म्हणायचे आहे. रामराजेंची नवी इनिंग कोणत्या पक्षाकडून असणार. ते सत्तेसोबत राहून अजित पवार यांना साथ देणार की शरद पवार यांच्यासोबत तुतारी हाती घेणार, याची उत्सुकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर रामराजे नाईक निंबाळकर यांनी अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंत केले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार करण्यास रामराजे यांनी नकार दिला होता. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर रामराजेंचे बंधू संजीवराजे नाईक यांनी तुतारी हाती घेतली होती. तसेच, रामराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली नव्हती. मात्र, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रचारही केलेला नव्हता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी रामराजेंच्या आग्रहास्तव फोनवरून भरसभेत दीपक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, निंबाळकर गटाचे दीपक चव्हाण यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी डावलून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. निकालापासून रामराजे राजकीय घडामोडींपासून लांब होते. मात्र, आजच्या त्यांच्या स्टेट्समुळे रामराजेंबाबत उत्सुकता वाढली आहे. फलटण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर रामराजे प्रथमच स्टेटसच्या माध्यमातून व्यक्त झाले आहेत, त्यामुळे रामराजे हे नेमके कोणती राजकीय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.