सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी गहू लागल्या आहेत. नुकतेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी देत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी आपल्या ५ हजार कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. त्यांच्यानंतर आता फलटण येथील आसू येथे झालेल्या विकासकामांच्या कार्यक्रमातून उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी थेट शिवरुपराजे खर्डेकर यांच्याशी कायमचे राजकीय संबंध संपल्याचे जाहीर करत त्यांच्यावर निशाणा साधला.
फलटण तालुक्यातील आसू येथे आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत विकासकामांच्या उदघाटनाचा कार्यक्रम पार पाडला. यावेळी रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, प्रशासनाला हाताशी धरुन माझ्या कार्यकर्त्यांना खासदारांनी प्रचंड त्रास दिला. शिवरुपराजे यांना एवढं करायचं होतं तर ते आमच्याकडे का आले? एक वेळ रणजितसिंह ना. निंबाळकर यांच्याबरोबर तडजोड होऊ शकते. कारण ते घर इथलं आहे. परंतु शिवरुपराजेंबरोबर मी आता कदापिही तडजोड करणार नाही. माझं राजकारण संपलं तरी चालेल. शिवरुपराजे तुमचा निर्णय तुम्हाला लखलाभ. मला काय भोगायला लागेल ते मी भोगेन. पण तुमचे आणि आमचे राजकीय संबंध संपले आहे.
यावेळी कार्यक्रमास यावेळी आ. दीपक चव्हाण, जि. प. चे माजी अध्यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर, विश्वजीतराजे ना. निंबाळकर, श्रीराम कारखान्याचे संचालक स्वामीनाथ साबळे, राजन फराटे, संतोष खटके, बापूराव गावडे स्वमीनाथ साबळे, प्रमोद झांबरे उपस्थित होते. यावेळी आ. रामराजे म्हणाले, अजितदादांना काय उत्तर द्यायचं ते माझं मी देईन. अजितदादांच्या एकनिष्ठतेची शपथ वाहायची तुम्हाला काही गरज नाही. तुमचे व आमचे राजकीय संबंध यापुढे कायमचे संपले. आम्ही तुम्हाला तालुक्याचे सभापती, उपसभापती, मार्केट कमिटीचे सभापतीपद दिलं ते काय अजितदादांना विचारून केलं होतं का? आम्ही तुमच्या घराण्याकडे, तुमच्याकडे बघून हे केलं होतं.
तुम्ही आम्हाला अजितदादांच्या एकनिष्ठतेची शपथ कशाला सांगता? शिवरुपराजेंनी त्यांची भूमिका जाहीर करावी. तालुक्याच्या अनेक अडचणींच्या वेळी शिवरूपराजे कुठे होते? श्रीराम कारखाना, साखरवाडी कारखाना अडचणीत असताना, लोकसभेच्या वेळी सांगोल्याला पाणी गेलं तेव्हा कुठे होते? त्यांनी फक्त आसू आणि आसू पुरतंच पाहिलं. ज्या माणसाने जनतेची घरदारं बघितली नाहीत. केवळ स्वार्थ बघितला अशा नेतृत्वाला आपण मोठं केलं.
तुम्ही सुरुवात केली आहे शेवट आम्हीच करणार
कार्यकर्त्यांनो तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. आम्ही शून्यातून राजकारण सुरू केलं होतं, असली अनेक वादळं बघितली आहेत. परंतु हा अस्तनीतला साप आम्हाला नको आहे. मागे बोलायची सवय सोडा तुम्ही जे काही बोलता ते सगळं आम्हाला समजतं? आमच्या अडचणीचं राहू द्या. आमचं आम्ही बघू, मात्र सर्वसामान्य माणूस अडचणीत असताना तुम्ही त्यांचा व विचार केला नाही केवळ स्वार्थ पाहिला हे दुर्दैवच. तुम्ही सुरुवात केली आहे शेवट आम्हीच करणार, असल्याचे निंबाळकर यांनी म्हंटले.