वाईतील कार्यक्रमाला रामराजेंची दांडी; अजितदादांची वाढली डोकेदुखी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात जनसन्मान यात्रेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमास विधान परिषदेचे माजी सभापती तथा अजित पवार गटाचे फलटणचे जेष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी दांडी मारली आहे. त्यांच्या गैरहजर राहण्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत लोणंद येथे पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन पार पडल्यानंतर वाईत जनसन्मान यात्रेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आमदार मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील देखील उपस्थित आहेत. मात्र, यावेळी कार्यक्रमास माजी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी अनुपस्थिती लावल्याचा प्रकार घडला. त्यांच्या या अनुपस्थितीची जोरदार चर्चा सध्या कार्यक्रमस्थळी व जिल्हाभर सुरु झाली आहे.

वाई खंडाळा मतदार संघाचे आमदार मकरंद पाटील यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात लाडक्या बहिणींशी संवाद साधण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी सातारा दौऱ्यावर आले आहेत. परंतु, या कार्यक्रमापेक्षा फलटणमधील राजकीय घडामोडींवर अजितदादा काय तोडगा काढणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून असून आज कार्यक्रमास चक्क रामराजेंनी दांडी मारली असल्याने त्यांची नाराजी उघडपणे दिसून आली आहे.

रामराजेंच्या नाराजीवर तोडगा निघणार का?

शरद पवारांची साथ सोडून अजितदादांसोबत गेलेल्या रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपच्या माण खटावमधील माजी खासदार आणि विद्यमान आमदाराविरोधात दंड थोपटले आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून कार्यकर्त्यांना त्रास दिला जात असल्याची तक्रार रामराजेंनी जाहीरपणे केली आहे. तसेच अजितदादांची साथ सोडून तुतारी हाती घेण्याचे संकेतही रामराजेंनी दिले होते. आज प्रत्यक्ष कार्यक्रमास अनुपस्थित राहून रामराजेंनी दाखवून दिले आहे.

…तर जिल्ह्यात महायुतीला मोठा धक्का बसणार?

रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज वाई येथील अजितदादांच्या कार्यक्रमास दांडी मारून एक प्रकारे कार्यकर्त्यांची भूमिकाच जाहीर केली आहे. रामराजेंनी तुतारी हाती घेतल्यास सातारा जिल्ह्यात महायुतीला मोठा धक्का बसू शकतो. सातारा जिल्ह्यातील आठ मतदारसंघांपैकी चार मतदारसंघांचं समीकरण बदलणार हे नक्की. वाई, कोरेगाव, माण आणि फलटण या चार मतदारसंघांवर रामराजे नाईक निंबाळकर यांचा प्रभाव आहे. त्यामुळं रामराजे नाईक निंबाळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यास महायुतीला विधानसभा निवडणूक सातारा जिल्ह्यात अवघड जाऊ शकते.

शरद पवारांनी इंदापूरात फलटणच्या पक्षप्रवेशाचा उल्लेख खरा ठरणार?

इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळी उपस्थितांना जाहीर आवाहन करताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांनी येत्या १४ ऑक्टोबर रोजी फलटणमध्ये मोठा पक्षप्रवेश होण्याचे सूतोवाच दिले. “मी जास्त काही बोलत नाही. चित्र बदलतंय. आज हा कार्यक्रम झाला. निघायच्या वेळी आणखी कुठूनतरी फोन आला. त्यांनी हट्ट केली की इंदापूरला तुम्ही आले, १४ तारखेला आमच्याकडे आलंच पाहिजे. मी विचारलं काय कार्यक्रम आहे? तर ते म्हणाले इंदापूरला जो कार्यक्रम आहे तोच कार्यक्रम आहे. मी विचारलं कुठे? तर ते म्हणाले फलटणला. समजलं का? त्यामुळे आता यानंतर फलटण. त्यानंतर पुढचा महिनाभर जवळपास सगळे दिवस बुक झाले आहेत. लोकांच्या मनात हा विचार आहे की एकत्र आलं पाहिजे. परिवर्तन झालं पाहिजे”, असं ते म्हणाले.