सातारा प्रतिनिधी | पुणे-मिरज रेल्वे लाईनच्या कामामध्ये कोरेगाव तालुक्यातील भीमनगर, दरे या गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. मात्र, त्यांना अद्यापही जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. तो शेतकऱ्यांना देण्यात यावा तसेच सातारा-पंढरपूर रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अन्यथा 35 कुटुंबांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आत्मदहन करणार करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे यांनी कोरेगावच्या तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे.
जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, ‘भीमनगर, दरे’ प्रश्नी मुख्यमंत्री कार्यालयास तसेच सातारा-पंढरपूर महामार्गाच्या कामाबाबत पंतप्रधान कार्यालयास प्रशासनामार्फत स्वतंत्रपणे निवेदने दिली आहेत. पुणे-मिरज रेल्वे लाईनच्या सध्या सुरू असलेल्या कामामध्ये भीमनगर, दरे या गावांतील 35 खातेदारांच्या शासनाकडून मिळालेल्या पुनर्वसित शेतजमिनी गेल्या आहेत. तसेच भीमनगर येथील स्मशानभूमीची 13 गुंठे व दरे येथील स्मशानभूमीची 17 गुंठे, अशी एकूण 30 गुंठे जमीन रेल्वे लाईनच्या कामामध्ये गेली आहे. त्या बदल्यात जमीन अथवा आर्थिक मोबदला ग्रामस्थांना मिळालेला नाही.
याप्रश्नी दि. 2 फेब्रुवारी रोजी निवेदन दिले होते. तसेच गेल्या दि. 23 फेब्रुवारी रोजी ठिय्या आंदोलन केले होते. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. याप्रश्नी न्याय न मिळाल्यामुळे भीमनगर, दरे गावांतील 35 कुटुंबांसोबत दि. 10 जुलै रोजी सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आमरण उपोषणास बसणार आहोत. त्यानंतर देखील न्याय न मिळाल्यास भीमनगर, दरे येथील 35 कुटुंबांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आत्मदहन करणार असल्याचे रमेश उबाळे यांनी निवेदनात म्हंटले आहे. निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री, रेल्वे मंत्री व सातारा जिल्हाधिकाऱ्यांना पाठवल्या आहेत.