सातारा प्रतिनिधी | केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना. रामदास आठवले हे रविवारी जिल्हा दौर्यावर आले होते. यावेळी सातारच्या शासकीय विश्रामगृहावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उल्हासनगर येथे झालेल्या गोळीबार प्रकरणी प्रतिक्रिया देत महत्वाचे विधान देखील केले. “उल्हासनगर येथे भाजप आमदाराने शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार केला. दोघांमधील जमीन वादाच्या व्यवहारातून ही घटना घडली आहे. पोलिस ठाण्यातच ही घटना घडली ही बाब गंभीर आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काहीही काडीमात्र संबंध नाही. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्याची आवश्यकता नाही, असे ना. आठवले यांनी म्हंटले.
यावेळी ना. आठवले पुढे म्हणाले की, गोळीबार प्रकरणात संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. कायद्यानुसार संशयितांवर कारवाई होईल. संबंधित जखमी नेता हा मुख्यमंत्र्यांच्या गटातील असल्याने त्यांनी त्यांची चौकशी केली. त्यावरून त्यांच्यावर आरोप करणे चुकीचे आहे. प्रकाश आंबेडकर दलित समाजाचे मोठे नेते आहेत.
महाविकास आघाडीत ते जात असले तरी त्यांचा महाविकास आघाडी अपमान करत आहे. प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडी घेत नसेल तर त्यांनी एनडीएमध्ये समाविष्ट व्हावे. ते आमच्याबरोबर आले तर चांगले होईल. जर त्यांना आमच्याकडे यायचे नसेल तर त्यांनी महाविकास आघाडीतही न जाता स्वबळावर लढावे. दलित समाजासह पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली ओबीसी, दलित, अदिवासींसह अन्य समाजाला न्याय मिळत आहे. संविधानाबाबत उलट सुलट चर्चा आज केली जात आहे.
देशात दलित व ओबीसी मते मोठ्या प्रमाणात असून, रिपाईंलाही लोकसभेत संधी मिळाली पाहिजे. या दृष्टीने महायुतीच्या नेत्यांनी विचार करावा. माझ्याप्रमाणेच कार्यकर्त्यांना महाराष्ट्रातील सत्तेत वाटा, जिल्हा नियोजन समिती सदस्य यासह विविध कमिट्यावर संधी द्यावी. रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार लवकरात लवकर करावा त्यामध्ये रिपाइंला मंत्रिपदाची संधी मिळावी, अशी अपेक्षाही ना. आठवले यांनी यावेळी व्यक्त केले.