सातारा प्रतिनिधी । काही दिवसात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची घोषणा होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्ष कामाला आहेत. सातारा जिल्ह्यात देखील महायुती आणि महाविकास आघाडीचा वरिष्ट नेत्यांकडून कार्यक्रमाच्या निमित्ताने हजेरी लावली जात असताना यामध्ये आरपीआयचे नेते देखील मागे नाहीत. केंद्रीय मंत्री आणि आरपीआय आठवले गटाचे नेते रामदास आठवले यांनी आज साताऱ्यात एका कार्यक्रमास उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी थेट वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनाच ऑफर देत मोठे विधान केले आहे. तसेच “राज्यात महायुतीमध्ये तीन प्रमुख पक्ष असले तर आम्हाला गृहीत धरू नका,” असा इशारा देखील आठवले यांनी दिला आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज साताऱ्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांनी आरपीआय सोबत यावे. मी आरपीआयचे नेतृत्व सोडायला तयार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करून त्यांनी आरपीआयचे नेतृत्व हातात घ्यावे, आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू. तर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आरपीआय पक्षाला 8 ते 10 जागा मिळाव्यात. राज्यात महायुतीच्या 170 च्या पुढे जागा निवडून येतील. मात्र, राज्यात महायुतीमध्ये तीन प्रमुख पक्ष असले तर आम्हाला गृहीत धरू नका, असा इशारा देखील रामदास आठवले यांनी दिला आहे.
मी ज्यांच्या सोबत असतो त्यांचे सरकार येते : रामदास आठवले
मी ज्यांच्या सोबत असतो त्यांचे सरकार येते, अशी मिश्किल टिप्पणी देखील रामदास आठवले यांनी केली आहे.तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समान नागरी कायदा आणणार असं वक्तव्य केलं आहे. त्या बाबत रामदास आठवले यांनी देखील सहमती दर्शवत समान नागरी कायदा आला पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केली आहे.