सातारा प्रतिनिधी | साताऱ्यात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर व राहुल सोलापूरकर यांच्यावर निशाणा साधला. “प्रशांत कोरटकर व राहुल सोलापूरकर यांच्यावर गंभीर कलमे लावून त्यांना जेलमध्ये टाका,” अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.
सातार्यात पत्रकार परिषदेवेळी ‘रिपाइं’चे ‘ जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, विजयराजे ढमाळ, अण्णा वायदंडे आदी उपस्थित होते. यावेळी राज्यमंत्री आठवले म्हणाले, नेतेमंडळींच्या सहवासातील लोक जर बेताल बोलत असतील तर महाराष्ट्राच्या संस्कृतीला ते न शोभणारे आहे. याबाबत कायदा करण्याची गरज आहे. आगामी काळात आम्ही पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार आहोत. त्याअनुषंगाने दि. ९ एप्रिलला लोणावळा येथे एक हजार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या छावा चित्रपटानंतर औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा पुढे येत आहे. कबरी काढून इतिहास पुसला जाणार नाही. सरकारने कायदा व सुव्यवस्था राहावी, अशा पद्धतीने निर्णय घेण्याची गरज आहे. तसेच साखरवाडी येथे बौद्ध विहारासाठी जागा द्यावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार असल्याचेही राज्यमंत्री आठवले यांनी यावेळी सांगितले.