कराड प्रतिनिधी । सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या रोटरी क्लब ऑफ कराडच्या रोटरी वर्ष 2024 – 25 साठी नवनिर्वाचित संचालक मंडळा निवडी नुकत्याच पार पडल्या. यावेळी अध्यक्षपदी रामचंद्र लाखोले तर सेक्रेटरी पदी रो आनंदा थोरात यांची निवड करण्यात आली.
रोटरी क्लब ऑफ कराडच्या संचालक मंडळात व्हाईस प्रेसिडेंट रो रघुनाथ डुबल, जॉइंट सेक्रेटरी रो शुभांगी पाटील, ट्रेजरर रो किरण जाधव, क्लब ट्रेनर म्हणून रो गजानन माने आणि रो विनायक राऊत यांची सार्जंट आर्म म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी विविध कमिटी चे चेअरमन व पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.
यावर्षीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो.डॉ.सुरेश साबू , जालना यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण डिस्ट्रिक्ट मध्ये सामाजिक काम होणार आहे. या डिस्ट्रिक्ट मध्ये 11 जिल्ह्यांचा समावेश आहे यामध्ये जवळपास 91 क्लब येतात. रोटरी क्लब ऑफ कराडचे हे 68 वे वर्ष आहे. आज अखेर रोटरी क्लब कराडने कराड आणि कराडच्या परिसरामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक कामे केली आहेत. रोटरी वर्ष सन 2024-25 या वर्षासाठी निवड झालेल्या सर्व रोटरी क्लब ऑफ कराडच्या पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.
नूतन अध्यक्ष रो रामचंद्र लाखोले म्हणाले, यावर्षी ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यावर आधारित असलेल्या ॲनिमिया फ्री इंडिया प्रोजेक्ट, कराड तालुक्यामधील विविध कॉलेजमध्ये क्वालिटी लाईफ थ्रू माईंड मॅनेजमेंट प्रोजेक्ट, अन्नछत्र प्रकल्प अंतर्गत डॉ.द.शि. एरम मूकबधिर शाळा मध्ये पोस्टीक आहार वाटप, गर्भसंस्कार शिबीर, नेत्र तपासणी शिबिर, पर्यावरण संवर्धन अंतर्गत सीडबॉल निर्मिती व वृक्षारोपण, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, स्विमिंग कॉम्पिटिशन, ॲथलेटिक्स स्पर्धा हे सुरू असलेले प्रकल्प चालू ठेवत अमरधाम प्रोजेक्ट स्मशानासाठी शेड, डायबिटीस पेशेंटसाठी शिबिर, ॲनिमिया मुक्त गाव, डेंटल चेकअप, ब्लड डोनेशन, ऑर्गन डोनेशन, आय डोनेशन हेही डिस्ट्रिक्टने सुचवलेले प्रोजेक्ट आदींसह विविध प्रोजेक्ट राबविण्यात येणार आहेत.
सेक्रेटरी रो आनंदा थोरात म्हणाले, रोटरी क्लबच्या माध्यमातून आगामी काळात सामाजिक आणि लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. वंचितांसाठी, दिव्यांगासाठी व महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविण्यात येणार आहेत, तसेच यावर्षी शांतता आणि संघर्ष प्रतिबंध, रोगप्रतिबंध आणि उपचार, पाणी आणि स्वच्छता, माता आणि बाळाचे आरोग्य, मूलभूत शिक्षण आणि साक्षरता, आर्थिक आणि सामुदायिक विकास, निसर्गाचे संगोपन या रोटरीच्या या ७ फोकस एरियावर काम होणार आहे.