कराड प्रतिनिधी | बांगला मुक्ती लढ्यात भारताने पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयाप्रित्यर्थ १६ डिसेंबर हा विजय दिवस म्हणून देशभर साजरा केला जातो. कराडमध्ये विजय दिवस समारोह समितीच्या वतीने गेली २५ वर्षे विजय दिवस साजरा होत होता. यंदा विजय दिवस समारोहाचा शिवाजी स्टेडियमवर होणारा मुख्य सोहळा रद्द झाला आहे. याबाबत ‘हॅलो महाराष्ट्र’ने दिलेलं वृत्त तंतोतंत खरं ठरलं आहे. दरम्यान, यंदाचा जीवन गौरव यशवंत पुरस्कार माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप यांना शनिवारी समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती विजय दिवस समारोहाचे संस्थापक कर्नल (नि.) संभाजीराव पाटील यांनी आज दिली. तसेच यंदापासून विजय दिवस सोहळ्याचे स्वरूप बदलण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
कराड येथील विजय दिवस समारोहच्या कार्यक्रमाबाबत माहिती देण्यासाठी आज कराड येथे विजय दिवस समारोह समितीतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी समितीचे उपाध्यक्ष अरुण जाधव, सचिव अॅड. संभाजीराव मोहिते, सहसचिव विलासराव जाधव, अॅड. परवेझ सुतार, प्रा. बी. एस. खोत, श्री.अपीने सर, रमेश पवार, सुधीर एकांडे उपस्थित होते.
यावेळी कर्नल संभाजी पाटील म्हणाले, केंद्र सरकार, राज्य सरकार, भारतीय सैन्य दल, स्थानिक प्रशासन आणि लोकसहभागाने कराडला साजरा होणारा विजय दिवस जनमानसात मोठे स्थान निर्माण करून आहे. यंदा विजय दिवसच्या मुख्य कसरती होणार नाहीत. मात्र, उद्या सकाळी नऊ वाजता स्वराजाचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या यांच्या तळबीड येथील समाधीस्थळी माजी केंद्रीय मंत्री खलप, अॅड. मोहिते व मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात येईल.
त्यानंतर सकाळी ११ वाजता येथील वेणुताई चव्हाण स्मारकमध्ये महासैनिक मेळावा होईल. त्यास अधिकारी उपस्थित राहतील. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता वेणुताई चव्हाण सभागृहात जीवन गौरव यशवंत पुरस्काराचे माजी केंद्रीय मंत्री अॅड. खलप यांना लेफ्टनंट कर्नल सुरेश पाटील, वीरपत्नी श्रीमती पूजा उकलीकर (वसंतगड), आदर्श माता भाग्यश्री कुलकर्णी-प्रभुणे (धुळे) यांना छत्रपती शाहू महाराज, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, कॅप्टन अशोक महाडकर, पालिकेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल, अशी माहिती कर्नल पाटील यांनी दिली.