कराड प्रतिनिधी । आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत-जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवार यांची कराडातील प्रीतीसंगमावर भेट झाली. यावेळी दोघांच्या भेटीत अजित पवारांनी रोहित पवारांना “ढाण्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं,” असा मिश्कील टोला लगावला. यावर सभा झाली असती तर निकाल वर-खाली झाला असता, अशी कबुली रोहित पवारांनी दिली. या दोघांच्या भेटी व संवादानंतर आता कर्जत-जामखेडमधील भाजप आणि महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांनी खळबळजनक आरोप केला आहे. “कर्जत जामखेडमध्ये मी कटाचा बळी ठरलो. हे आज दिसून आलंय, असे शिंदे यांनी म्हंटलं आहे.
अजित पवार आणि रोहित पवार यांच्या भेटीनंतर कर्जत -जामखेडमधील भाजप आणि महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, कर्जत जामखेडमध्ये मी कटाचा बळी ठरलो. हे आज दिसून आलंय, मी महायुतीचा धर्म पाळण्यासाठी अजित पवार यांच्याकडे मागणी करत होतो. मी सभेला आलो असतो तर काय झालं असतं?, असं अजित पवार बोलले, म्हणजे हा सुनियोजित कट होता असं दिसत आहे.
माध्यमांमध्ये बोलण्याची माझी इच्छा नव्हती. मात्र, अजित पवार बोलले त्यामुळे बोलतोय. मला वाटतं की कौटुंबिक कलाह दरम्यान काही करार झाले, त्याचे प्रत्यय कर्जत जामखेडमध्ये जाणवला. शरद पवार विधानसभेत पोहोचले तेव्हा माझा जन्म देखील झाला नव्हता. मोठी बलाढ्य शक्ती माझ्यासमोर होती. माझा सहावा क्रमांक लागतोय जो सर्वाधिक मतं घेऊन पराभूत झाला. महायुतीच्या लोकांबरोबर असं होत असेल तर बरोबर नाही. मतमोजणीसंदर्भात तक्रार केली आहे, मात्र ती फेटाळण्यात आलीय. जिल्हाधिकारी यांच्याकडे पुन्हा अर्ज करणार आहे, हे काय निर्णय घेतात त्यानंतर पुढे कारवाई करणार आहे, असे देखील यावेळी राम शिंदे यांनी सांगितले.