कराड प्रतिनिधी । कुटुंबाच्या मजबूत पाठिंब्यामुळे आणि स्वतःच्या प्रचंड मेहनतीच्या जोरावर राजवर्धन पाटील याने तब्बल आठ वर्षे सराव करून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करत सुवर्णपदकाला गवसणी घातली हा केवळ कराड तालुक्याचाच नव्हे, तर राज्याचा आणि देशाचा बहुमान आहे. त्यामुळे त्याला ब्रँड अँबेसिडर करून निवडणूक आयोगाने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृती सुरू केली आहे. त्यामुळे निश्चित मतदानाचा टक्का वाढविण्यात यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करून राजवर्धन पाटील याच्या यशापासून युवा पिढीने प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादन कराड दक्षिण निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी केले.
राजवर्धन आशुतोष पाटील याची कराड शहरातून भव्य रॅली काढून सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाच्या भव्य पटांगणावर निवडणूक आयोग व कराडकर नागरी गौरव समितीच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी एसजीएम् कॉलेजचे प्राचार्य मोहन राजमाने होते. तर यावेळी रयत शिक्षण संस्थेचे कौन्सिल सदस्य ॲड. रवींद्र पवार, कराड उत्तरच्या सहा. निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ढवळे आदी क्रीडाशिक्षक यांच्यासह मान्यवर व मोठ्या संख्येने महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
आरटीओ अधिकारी चैतन्य कणसे म्हणाले, राजवर्धन पाटील याचे यश कौतुकास्पद आहे. युवा पिढीने मोबाईलपासून दूर रहावे. मोबाईलचा स्क्रिन टाईम कमी करून तो वेळ अभ्यास, खेळ यासाठी दिल्यास यश मिळविणे कठीण नाही. प्राचार्य मोहन राजमाने म्हणाले, राजवर्धन पाटील याने कराडसह राज्याचा आणि देशाचा नावलौकिक वाढविला असून जिद्द व चिकाटी कायम ठेवल्यास यश मिळतेच. त्याचबरोबर लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा अधिकार बजावलाच पाहिजे असेही आवाहन त्यांनी केले.
सहाय्यक नोडल अधिकारी महेंद्र भोसले यांनी प्रास्ताविक केले. सहाय्यक नोडल अधिकारी आनंदराव जानुगडे यांनी सूत्रसंचालन करून सर्वांना मतदानाचा टक्का वाढविण्याची शपथ दिली. तर कराड दक्षिणचे सहा. नोडल अधिकारी सुनिल परीट यांनी आभार मानले.