कराड प्रतिनिधी । स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सातारा जिल्ह्यातील सर्व दुध उत्पादक शेतकऱ्यांकडून दि. २३ डिसेंबर रोजी राष्ट्रीय किसान दिनादिवशी संपूर्ण सातारा जिल्ह्यात बेमुदत दुध आंदोलन केले जाणार आहे. तसेच आंदोलन काळात जिल्ह्यातून होणारी इतर जिल्ह्यातील सर्व प्रकारची दुध वाहतूक बंद केली जाणार असून या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी सातारा जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. आपल्या न्याय हक्कासाठी आपणच रस्त्यावर मोठ्या संख्येने उतरावावे, असे शेट्टी यांनी म्हंटले आहे.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी आवाहन करताना म्हंटले आहे कि, पशु खाद्याचे दर भरमसाठ वाढलेले आहेत तसेच उत्पादन खर्च देखील वाढलेला आहे. अशा परिस्थितीत खरं तर दुधाला ३८ रुपयांपेक्षा जास्त भाव हा मिळायला हवा होता. पण प्रत्यक्षात सातारा जिल्ह्यातील दूध संघानी दुधाचे भाव कमी केलेले आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरलेला आहे. त्या असंतोषाला वाट करून देण्याचा प्रयत्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला असून सर्व शेतकऱ्यांना एक विनंती कि त्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे.
कारण आता निवडणूक झाल्या असून आता कोणत्याही पक्षाला अथवा कोणत्याही राजकीय नेत्याला शेतकऱ्यांच्या प्रश्नात अथवा सुख दुःखात काहीही देणंघेणं नाही. त्यामुळे आपले परशा आपणच सोडवायचे आहेत. या भूमिकेतून शेतकऱ्यांनी नैराश्य झटकून २३ रोजी होणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करत आहे.
काहीही झालं तरी आंदोलन हे करणारचं : प्रमोदसिह जगदाळे
येत्या २३ डिसेंबर पासून संपूर्ण सातारा जिल्ह्यात बेमुदत दूध बंद आंदोलन पुकारलेले आहे. जोपर्यंत आपल्या चौदा मागण्या शासन मान्य करत नाही तो पर्यंत एकाही दूध उत्पादक शेतकऱ्याने आपले दूध डेअरीला घालू नये असे आम्ही आवाहन कारले आहे. तसेच आम्ही दूध दरवाढी संदर्भात कराड उत्तर व दक्षिण मधील विद्यमान आमदारांना देखील निवेदने दिली असून जिल्हाधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली. मात्र, काहीही तोडगा निघाला नसल्याने आम्ही आंदोलनावर ठाम असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कराड उत्तरचे अध्यक्ष प्रमोदसिह जगदाळे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली आहे.
‘या’ आहेत प्रमुख चौदा मागण्या
१) गाईच्या दुधाला ४० रुपये प्रतिलिटर व म्हशीच्या दुधाला ७० रुपये प्रतिलिटर दर मिळावा.
२) पशुखाद्याचे दर कमी करावेत किंवा रासायनिक खत युरियाला ज्या पध्दतीने शासकीय अनुदान देण्यात येते, त्या धर्तीवर पशुखाद्यालाही अनुदान देण्यात यावे.
३) दुध उत्पादक शेतकऱ्यांना या व्यवसायाची शाश्वती मिळेल यासाठी शासनाने ठोस “दुध धोरण’ तयार करावे.
४) इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याने दुधाचा स्वतःचा एक ब्रँड विकसीत करावा.
५) दुधाला ऊसाप्रमाणे ८०-२० फॉर्म्युला आणून एफ. आर. पी. कायदा लागू करावा.
६) दुधामधील खासगी व सहकारी लुटमार विरोधी कायदा करावा.
७) सदोष मिल्क मिटरमधून होणारी लुटमार थांबवावी.
८) सातारा जिल्ह्यातील सर्व खाजगी व सहकारी दुध संघाने कोल्हापूर, सांगली जिल्ह्याप्रमाणेच दुधाला दर द्यावेत.
९) तालुकावार मिल्कोमीटर टेस्टींग तपासणी भरारी पथक नियुक्त करावे.
१०) शासनाची जनावरे विमा योजना पुन्हा सुरु करावी.
११) राज्यातीली दुध दर निश्चित करण्यासाठी गठीत केलेल्या समितीमध्ये शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी व दुध उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश करावा.
१२) दुध भेसळ रोखण्यासाठी गठीत केलेल्या जिल्हास्तरीय समितीमध्ये शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी व दुध उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश करावा.
१३) महाराष्ट्र राज्यातील सर्व सहकारी दुध संस्था / दूध संघांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७९अ अन्वये या कायद्याचे पालन न करणाऱ्या दुध संघावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
१४) शासनाकडून दुध उत्पादकांना मिळणारे प्रतिलिटर अनुदान तातडीने दुध उत्पादकांच्या बैंक खात्यात जमा करावे.