सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा शहरातील शिवतीर्थ येथील पोवई नाक्याच्या चौकाला लोकनेते स्व.बाळासाहेब देसाई यांचे नाव देण्याच्या घाट घातला जात आहे. याबाबतच्या बातम्याही प्रसारित झाल्या होत्या. नामांतराच्या या चर्चेनंतर पालकमंत्री शंभूराज देसाई आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट १३ वे वंशज खासदार उदयनराजे भोसले गटात नव्या वादाची ठिणगी पडली आहे. एकीकडे हे सगळं सुरु असताना राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीत कल्पनाराजे यांनी शंभूराज देसाई यांच्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असल्याची चर्चा सुरु आहे.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचनेनेनुसार, पोवई नाका परिसराला लोकनेते बाळासाहेब देसाई चौक हे नाव देण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत. सोमवारी शंभूराजे देसाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जी कामाची यादी पाठवली होती, त्यामध्ये पहिलेच काम होते ते म्हणजे पोवई नाक्यावरील बाळासाहेब देसाई चौक (आयलँड) विकसित करणे या कामाचा समावेश नियोजन मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला आहे. या पत्रामुळे नामांतराच्या चर्चानी जोर धरला आणि त्यामुळे सातारा शहरातील नागरिकांच्या भावना दुखावल्या. याच पार्श्वभूमीवर कल्पनराजे भोसले यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेतली आहे, यावेळी खासदार श्रीकांत शिंदे हे सुद्धा उपस्थित होते. या भेटीत कल्पनराजे यांनी शंभूराज देसाई यांची तक्रार एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असल्याचे बोललं जात आहे.
शिवतिर्थाचे नाव बदलून दुसरं कोण नाव देणं हे माझ्या मनातही नाही- शंभूराज देसाई
दरम्यान, शिवतिर्थाचे नाव बदलून दुसरं कोण नाव देणं हे माझ्या मनातही नाही. माध्यमांनी याचा विपर्यास केलाय. माझे आजोबा बाळासाहेब देई यांनीच त्याठिकाणी शिवरायांचा पुतळा उभारून त्या परिसराला शिवतीर्थ नाव दिले आहे, त्यामुळे आम्ही ते कस बदलू ? असा सवाल शंभूराज देसाई यानी केलाय. जस राजघराण्याला शिवरायांबद्दल आदर आहे तसाच आदर आम्हालाही आहे. परंतु दुसऱ्या मोकळ्या जागेत बाळासाहेब देसाई यांच्या नावाने आम्ही आयलंड तयार करून, त्याचे सुशोभीकरण करून नवीन काय काम करत असू तर त्याला कोणी विरोध करण्याचे काम नाही असेही शंभूराज देसाई म्हणाले.