सातारा प्रतिनिधी । राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मागणीचा आणि त्यासाठी जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या इशाऱ्याचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. सध्याच्या राज्य सरकारकडून मराठा समाजबांधवांना आरक्षण दिले जावे, अशी सर्वत्र मागणी होत असता सातारा येथे आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर मराठा आरक्षण कुणामुळे आणि कुणाच्या काळात मिळणार याबाबत एक मोठे विधान केले आहे. ‘मराठा समाजाचा आरक्षण गंभीर विषय आहे. आरक्षण मिळावे, पण कायमचे टिकणारे असावे, यासाठी सरकार काम करत आहे. मराठा समाजाला आरक्षण एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातच मिळेल, असा विश्वास क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
मुंबईत आझाद मैदानावर शिवसेनेच्या (शिंदे गट) दसरा मेळाव्याच्या नियोजनासाठी आज राजेश क्षीरसागर सातारा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सातारा जिल्हा रुग्णालयास लवकरच अचानक भेट देणार आहे. पाहिजे असल्यास दुचाकीवरून येऊन पाहणी करू. या रुग्णालयाचा टप्प्या-टप्प्याने विकास करण्याच्या अनुषंगाने आरोग्य उपसंचालकांसमवेत व्यापक बैठक घेणार असून ज्या काही आवश्यक गोष्टी लागणार आहेत त्या या ठिकाणी केल्या जातील. सातारा जिल्हयातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.
आम्ही दरवर्षी दसऱ्याला शिवतिर्थावर शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी जायचो. गेल्यावर्षी शिवसेनाप्रमुखांचे विचार आम्ही एकनाथ शिंदे यांच्या तोंडून ऐकण्यासाठी बीकेसी. मैदानावर गेलो तर यावर्षी आझाद शिवसैनिकांचा आझाद मैदानावर दसरा मेळावा होत आहे. सातारा जिल्ह्यातून किमान दहा हजार शिवसैनिक मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत. संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना पैशाची मागणी होत असल्यास तसेच असे प्रकार आढळून आल्यास ताबडतोड तक्रार करावी. सर्वसामान्यांना त्रास झाल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा क्षिरसागर यांनी यावेळी दिला.
सातारा लोकसभासाठी कुणाला जागा दिली जाणार?
सातारा दौऱ्यावर आलेल्या क्षीरसागर यांनी यावेळी सातारा लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत महत्वाची माहिती दिली. ते म्हणाले की, सातारा लोकसभा मतदार संघात निवडणुकीत जागा कुणाला द्यायची याबाबत चर्चा करण्यासाठी लवकरच युतीची बैठक होणार आहे. या बैठकीत त्याबाबत निर्णय होणार आहे. त्यानंतरच साताराची जागा युतीतील कोणत्या पक्षाचा उमेदवार लढवणार हे निश्चित होईल, असे क्षीरसागर यांनी म्हंटले.