सातारा जिल्ह्यातील 10 वी अन् 12 वीची परीक्षा कडक शिस्तीतच होणार : राजेश क्षीरसागर

0
1
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । कोल्हापूर विभागीय मंडळाच्या वतीने सातारा जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे प्राचार्य व मुख्याध्यापक यांची नुकतीच बैठक झाली. साताऱ्यातील सैनिक स्कूलमध्ये पार पडलेल्या बैठकीत यंदा होणाऱ्या दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त व गैरप्रकारमुक्त घेण्याबरोबरच निकालाची गुणवत्ता वाढवण्यासाठी सर्व प्राचार्य व मुख्याध्यापकांसह परीक्षा संचलनातील सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिले.

साताऱ्यातील बैठकीस विभागीय मंडळाचे सचिव सुभाष चौगुले, सहसचिव बी. एम. किल्लेदार, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, बोर्डाचे अधीक्षक सुधीर हावळ, एस. वाय. दूधगावकर, एम. जी. दिवेकर, एच. के. शिंदे, उपशिक्षणाधिकारी तेजस गंबरे, अधीक्षक संदेश जाधव, हेमंत खाडे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नितीन कोंडे, सचिव विजय येवले यांची उपस्थिती होती.

यावेळी क्षीरसागर म्हणाले की, ”महाविद्यालयातील प्राचार्य व माध्यमामिकी शाळांमधील मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी त्यांची तयारी चांगली करून घ्यावी. शाळास्तरावर उजळणी घेऊन पुरेसा प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करून घ्यावा. केंद्रावर होणारे गैरप्रकार बंद करावे ते न केल्यास कडक कारवाईला सामोरे जावे लागेल. विद्यार्थ्यांनाही शिक्षासूचीची माहिती द्या. विद्यार्थ्यांचे उद्‌बोधन वर्ग आयोजित करा.

कॉपीमुक्तीची शपथ घ्या व भयमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना यथायोग्य मार्गदर्शन करावे.” राज्य मंडळ व विभागीय मंडळाच्या संकेतस्थळाबाबत माहितीही क्षीरसागर यांनी माहिती दिली.