विद्यार्थ्यांनी तणावमुक्त होऊन बोर्ड परीक्षेला सामोरे जावे : राजेश क्षीरसागर

0
3

सातारा प्रतिनिधी । कोल्हापूर विभागीय मंडळ, जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग आणि मुख्याध्यापक संघाची विद्यार्थ्यांचे ‘जिल्हास्तरीय ऑनलाइन उद्बोधन’ सत्र नुकतेच पार पडले. यावेळी शालेय वयात दहावी आणि बारावी इयत्तांच्या परीक्षांना महत्त्वपूर्ण स्थान आहे. शालेय जीवनात हा टप्पा करियरसाठी महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे विद्यार्थी या दोन इयत्तांच्या परीक्षांसाठी अभ्यासाची विशेष तयारी करतात. या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी तणावमुक्त होऊन परीक्षेला सामोरे जावे’, असे मत उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केले.

यावेळी उपशिक्षणाधिकारी तेजस गंबरे, मुख्याध्यापक संघाचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन नलावडे, जिल्हाध्यक्ष नितीन कोंडे प्रमुख उपस्थित होते. दरम्यान, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर व मुख्याध्यापक संघाने ऑनलाइन चर्चासत्राचे उत्तम नियोजन केले होते. या उद्बोधन सत्रात सहभागी विद्यार्थी,पालकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. सर्व उद्बोधन सत्राचे आभासी पद्धतीने यूट्यूब समाजमाध्यमांद्वारे लाईव्ह प्रक्षेपण करून जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा लाभ देण्यात आला.

धोंडीराम वाडकर यांनी इंग्रजी विषयाची उत्तरपत्रिका लिहिताना घ्यावयाची काळजी, एस. डी. मेंढेकर यांनी हिंदी विषयाचे, राम टेके यांनी गणित विषयाचे, अंजली शिंदे विज्ञान विषयाचे, सूर्यकांत सिताराम पुजारी यांनी मराठी विषयाचे, प्रताप यादव यांनी सामाजिक शास्त्रे- इतिहास विषय तर जी. व्ही. मरे यांनी भूगोल विषयाचे मार्गदर्शन केले. बारावी कला शाखेबाबत गणेश पाटील यांनी व बारावी शास्त्र शाखेबाबत प्रा. वाळवेकर यांनी मार्गदर्शन केले. बारावी वाणिज्य शाखेबाबत प्रा. काळे यांनी मार्गदर्शन केले. भरतगाववाडीचे मुख्याध्यापक भरत मोजर यांनी सूत्रसंचालन केले.