कराड प्रतिनिधी | येत्या दोन तीन दिवसांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. या तापलेल्या वातावरणात यशवंत विकास आघाडीचे नेते आणि कराडचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी सोमवारी भव्य शक्तीप्रदर्शनाची तयारी केली आहे. या शक्तीप्रदर्शनातून यादव गट आपली निर्णायक ताकद दाखवणार आहे. तसेच राजेंद्रसिंह यादव कोणती राजकीय भूमिका जाहीर करतात, याकडे कराड दक्षिण मतदार संघाचे लक्ष लागून आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक आणि यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्रसिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कराडमध्ये सोमवारी (१४ ऑक्टोबर) भव्य महिला महामहोत्सव आयोजित करण्यात आलाय. यशवंत विकास आघाडी, जिजाई महिला मंच आणि उद्योग समुहाच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी दुपारी १२ ते सायंकाळी ६ या वेळेत महिला महोत्सव होणार आहे. सौ. रुग्वेदिका राजेंद्रसिंह यादव यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. शनिवार पेठेत यशवंत हायस्कूलपाठिमागे लल्लभाई मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे.
महोत्सवात महिलांसाठी पाक कला स्पर्धा, मिस कराड, होम मिनिस्टर, लाईव्ह ऑर्केस्ट्रा दांडिया, नारी सन्मान सोहळा, महिला बचत गटाच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री इत्यादी विविध कार्यक्रम होणार आहेत. नारी शक्ती सन्मान अंतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर यांचा सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रम फक्त महिलांसाठी असून त्यांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. येणाऱ्या प्रत्येक महिलेला हमखास भेटवस्तू मिळणार असून त्यांच्या अल्पोपहाराचीही सोय करण्यात आली आहे.
झी मराठी वाहिनीवरील गाजलेल्या ‘रात्रीस खेळ चाले’, या मालिकेतील अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर, बिग बॉस उपविजेता धनंजय पोवार, रिल स्टार रवी दाजी, अभिनेते आणि कला दिग्दर्शक वासू पाटील, अशा दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीने महिला महोत्सवाला उंची लाभणार आहे.