मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निधीतून कराड ‘फेज 2’ ची सुरूवात – राजेंद्रसिंह यादव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराडच्या भुयारी गटर आणि पाणी योजनेच्या अद्ययावतीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०९ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या दोन्ही योजना कराडकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून या माध्यमातून कराड फेज टू या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात झाली असल्याची माहिती यशवंत विकास आघाडी व शिवसेनेचे नेते राजेंद्रसिंह यादव यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

कराड शहराच्या दोन योजनांसाठी एकूण 209 कोटींचा निधी मंजूर झाल्यानंतर राजेंद्रसिंह यादव यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत शिवसेनेचे सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे व जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार यांचा सत्कार केला. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र माने, माजी नगरसेविका स्मिता हुलवान, हणमंत पवार, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख सुलोचना पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

राजेंद्रसिंह यादव म्हणाले, दिवंगत पी. डी. पाटील यांनी 50 ते 60 वर्षांपूर्वी कराडच्या विकासाच्या दृष्टीने भुयारी गटार योजना कार्यान्वित केली होती. वाढती लोकसंख्या व नागरीकरण पाहता या योजनेचे अद्ययावतीकरण होणे गरजेचे होते. नागरी सुविधांचे पुनरूज्जीवन आवश्यक असल्याने कराड फेज टू हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्याचा आमचा मानस आहे. त्यादृष्टीने गेले वर्षभर नगरपालिकेच्या विकास कामांचे विविध प्रस्ताव घेऊन शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कराडकरांची गरज ओळखून दोन मोठ्या योजनांना मंजुरी दिली आहे. यामुळे भविष्यातील दोन ते तीन पिढ्यांच्या दृष्टीने उपयुक्त कामे मार्गी लागणार आहेत.

भुयारी गटर योजनेत मूळ शहरासह वाढीव भागात ५२ किलोमीटरची नवी पाईप लाईन टाकण्यात येणार आहे. पंपिंग स्टेशन अद्ययावत करण्यात येणार आहेत. बारा डबरे परिसरात नवीन एसटीपी बांधण्यात येणार आहे. पाण्याच्या पुनर्वापराचा नवीन प्लांटही असणार आहे. पाणी योजनेत २०५६ साला पर्यंत लोकसंख्येला पुरेल, या पध्दतीने योजनेचं अद्ययावतीकरण होणार आहे. ही योजना सोलरवर चालणार असून जुन्या पाण्याच्या टाक्या नवीन बांधण्यात येतील. एसडीआर ओझोनेशन पद्धतीने पाण्याचे फिल्टरेशन होणार असून कराडकरांना मिनरल वॉटरप्रमाणे शुद्ध पाणी मिळणार आहे. सोलर बसवण्याने ही योजना नुकसानीतून फायद्यात येणार असल्याचे राजेंद्रसिंह यादव यांनी सांगितले.

कोयना नदीतून हँगिंग ब्रिजवरून पाईपलाईन नवीन शुद्धीकरण केंद्रात आणण्याच्या प्रस्तावावर काम सुरू असल्याचे सांगून राजेंद्रसिंह यादव म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शब्द पाळणारे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी कराडमध्ये दिलेला शब्द खरा करून दाखवला. यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई तसेच संपर्कप्रमुख शरद कणसे आणि जयवंतराव शेलार यांचेही प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरले.

दरम्यान, कराडकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या भुयारी गटार आणि पाणी योजनेसाठी राजेंद्रसिंह यादव यांच्या पाठीशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना आणि शासन ताकदीने उभे राहणार आहे. भविष्यात कराडच्या विकासिच्या वाटचालीत राजेंद्रसिंह यादव हे जास्तीत जास्त योगदान देतील, असा विश्वास संपर्कप्रमुख शरद कणसे यांनी व्यक्त केला.