कराड प्रतिनिधी | लोकनियुक्त नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यापासून गेली सव्वा 2 वर्षे कराड नगरपालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. ही राजवट इंग्रजी राजवटीपेक्षा जुलमी असल्याचा सणसणीत आरोप यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी पत्रकार परिषदेत केला. नागरीकांकडून खंडणी उकळून त्रास देणाऱ्या नगररचना विभागातील पाच अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली न झाल्यास बुधवारी संबंधित अधिकाऱ्यांना काळे फासून पालिकेला टाळे ठोकणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
यशवंत विकास आघाडीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस माजी नगरसेवक विजय वाटेगावकर, हणमंतराव पवार, स्मिता हुलवान, संगिता देसाई, प्रियांका यादव, गजेंद्र कांबळे, निशांत ढेकळे, किरण पाटील उपस्थित होते. राजेंद्रसिंह यादव म्हणाले की, नगरपालिकेवर प्रशासक आल्यानंतर कराडकरांना कोणी वालीच नाही, अशी अधिकाऱ्यांची समजूत झाली. त्यांच्या बेफिकीर आणि मनमानी कारभाराचा नागरीकांना प्रचंड त्रास व्हायला लागला. अधिकाऱ्यांकडून नागरीकांची कामे वेळेत होत नाहीत. अधिकारी आपल्या जागेवर नसतात. बांधकामाच्या संदर्भातील कामांसाठी मोठ्या प्रमाणात पेशाची मागणी होत आहे. त्यामुळे कराडकर हैराण झाले आहेत.
‘त्या’ नगररचना अधिकाऱ्यांची बदली न झाल्यास त्यांना काळे फासणार : राजेंद्रसिंह यादव यांचा इशारा pic.twitter.com/7qwfc2omzl
— santosh gurav (@santosh29590931) May 29, 2024
लोकनियुक्त नगरसेवक बॉडीचा कार्यकाळ संपल्यानंतर अधिकारी वर्गावर अंकुश ठेवणारी व्यवस्था नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांची मुजोरी वाढत गेली. मात्र, कराडकरांना होत असलेल्या त्रासाबद्दल यशवंत विकास आघाडी गप्प बसणार नाही. कराडकरांसाठी आम्ही छातीचा कोट करू. नगररचना विभागातील काही अधिकाऱ्यांनी माहिती अधिकार कार्यकर्त्यांना हाताशी धरून तक्रारी करायला लावल्या आहेत. त्या माध्यमातून नागरीकांकडून अक्षरशः खंडणी गोळा केली जात असल्याचा खळबळजनक आरोप राजेंद्रसिंह यादव यांनी केला. याविरोधात आम्ही आंदोलन करून पालिकेला टाळे ठोकणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राजेंद्रसिंह यादव पुढे म्हणाले की, नगरपालिकेत सुरू असलेल्या अंदाधुंद कारभाराबद्दल आणि कराडकरांवर होत असलेल्या अन्यायाची माहिती आम्ही मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना देणार आहोत. कराडकरांवरील अन्याय यशवंत विकास आघाडी कदापि सहन करणार नाही. पालिकेच्या नगररचना विभागातील पाच अधिकाऱ्यांवर बदलीची कारवाई करावी. अन्यथा नगर परिषदेला टाळे ठोकू. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना काळे फासले जाईल, असा गर्भित इशारा देखील यादव यांनी दिला.
पत्रकार परिषदेत कंत्राटदारांचे काय काम?
दरम्यान, यशवंत विकास आघाडीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस माजी नगरसेवक कमी आणि कार्यकर्ते, कंत्राटदारांचीच संख्या जास्त होती. ही बाब पत्रकारांच्या नजरेतून सुटली नाही. त्यामुळे नगरपालिका अधिकाऱ्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका मांडण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत कंत्राटदारांचे काय काम?, कंत्राटदारांची काही कामे अडली आहेत का?, अशी कुजबुज देखील कराड शहरात सुरू झाली आहे.