कराड प्रतिनिधी । दहावी आणि बारावीचे निकाल लागल्यामुळे विद्यार्थ्यांकडून अनेक कोर्सेसना प्रवेश घेण्यासाठी धावाधाव केली जात आहे. दहावीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी डिप्लोमा (पदविका) प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रवेश प्रक्रिया केंद्रीभूत (CAP) पद्धतीने राबवली जात आहे. विद्यार्थ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील तंत्रनिकेतनांसाठी एकच अर्ज https://poly23.dtemaharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने दाखल करावयाचा आहे. पालक व विद्यार्थ्यांसाठी सुविधा केंद्रही उभारण्यात आले असल्याची माहिती कराड येथील शासकीय तंत्रनिकेतचे प्राचार्य राजेंद्र पाटील यांनी दिली.
शासकीय तंत्रनिकेत महाविद्यालयाच्या वतीने नुकतीच पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी प्रवेश समितीचे अध्यक्ष प्रा. रजनीश पिसे, प्रा. आनंद पेंढारकर, उपाध्यक्ष प्रा. ज. ल. गावंडे, प्रा. डॉ. सुरेंद्र खवले आदी उपस्थित होते. यावेळी प्राचार्य पाटील म्हणाले की, संस्थेमध्ये अल्पसंख्यांक प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन व मेकॅनिकल या अभ्यासक्रमांच्या स्वतंत्र तुकड्या उपलब्ध आहेत. अल्पसंख्यांक प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 70 टक्के जागा राखीव असतात. परंतु अल्पसंख्यांक प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या अल्प प्रतिसादामुळे शिल्लक जागांवरती इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
सातारा जिल्हा तसेच कराड व आसपासच्या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय तंत्रनिकेतन, कराड येथे प्रवेश प्रक्रियेचे सुविधा केंद्र उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. शासकीय तंत्रनिकेतन, कराड ही संस्था वर्ष 1957 मध्ये स्थापन झालेली असून संस्थेला All India Council for Technical Education, New Delhi (AICTE) व Directorate of Technical Education, Mumbai (DTE) ची मान्यता आहे.
कराडचे शासकीय तंत्रनिकेतन Maharashtra State Board of Technical Education, Mumbai (MSBTE) संलग्न असून संस्थेमध्ये सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंस्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल व मेकॅट्रॉनिक्स हे अभ्यासक्रम शिकविले जातात. संस्थेतील इलेक्ट्रिकल व कॉम्प्युटर या अभ्यासक्रमांना राष्ट्रीय पातळीवरील मानांकन नुकतेच प्राप्त झाले आहे. संस्थेतील सर्व अभ्यासक्रमांकरिता पात्र विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजना उपलब्ध आहेत.
कराड परिसरामध्ये उपलब्ध असलेल्या या सुविधा केंद्राचा लाभ विद्यार्थी व पालक यांनी करून घेण्याचे आवाहन संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेंद्र का. पाटील, प्रवेश समितीचे अध्यक्ष प्रा. रजनीश पिसे, सल्लागार प्रा. आनंद पेंढारकर व उपाध्यक्ष प्रा.ज.ल. गावडे व डॉ. प्रा. सुरेंद्र वि. खवळे यांनी केले.