सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय गाडे यांच्या ‘एबी’ फॉर्ममध्ये स्वतः माझ्याकडून चूक झाली नसती, तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा ३७ हजार नव्हे, तर ७४ हजारांच्या मताधिक्याने पराभव झाला असता आणि तोंड दाखवायला जागा उरली नसती, असा टोला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष राजेंद्र गवई यांनी लगावला.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा निर्धार मेळावा येथील जितराज मंगल कार्यालयात नुकताच पार पडला. त्यावेळी श्री. गवई बोलत होते. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमारे, पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांत कांबळे, जिल्हाध्यक्ष संजय गाडे, जिल्हा प्रभारी हेमंत भोसले, कोरेगाव तालुकाध्यक्ष प्रशांत उबाळे, पुणे शहराध्यक्ष रवींद्र कांबळे, सातारा जिल्हा युवा आघाडीचे अध्यक्ष विशाल कांबळे, महाबळेश्वर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, विद्यार्थी आघाडीचे आशुतोष वाघमोडे, प्रशांत वाडकर आदी उपस्थित होते.
साताऱ्यातील आमच्या उमेदवाराला मिळालेली मते ही ‘तुतारी’मुळे मिळाली आहेत, असे म्हणणाऱ्यांना सांगतो, की आमचा एबी फॉर्म चुकला नसता, तर तुमचा ३७ नव्हे ७४ हजार मतांनी पराभव होऊन तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरली नसती. अजून वेळ गेलेली नाही. जातीयवाद्यांना हद्दपार करण्याचा मक्ता केवळ आम्ही घेतला नाही. विषाची परीक्षा घ्यायची असेल, तर अजून घ्या. येत्या निवडणुकीत सातारा जिल्ह्यात ८० हजार मते घेऊन दाखवू, असे आव्हानही श्री. गवई यांनी दिले.