सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या फलटण, पुणे येथील निवासस्थानासह गोविंद दूध संघावर आयकर विभागाने छापा टाकला होता. तब्बल 120 तास संजीवराजे यांची आयकरकडून चौकशी चालू होती. रविवारी रात्री अखेर ही चौकशी संपली. यानंतर आता रामराजे नाईक-निंबाळकर हे संतप्त झाले आहे. राजराजे नाईक-निंबाळकर यांनी आता व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून इशारा दिला आहे. त्यांनी नेमका कुणाला इशारा दिला आहे? याची चर्चा सद्या सुरू झाली आहे.
सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या फलटण, पुणे येथील निवासस्थानसह गोविंद दूध संघावर आयकर विभागाने बुधवारी ( 5 फेब्रुवारी ) सकाळी 6 वाजता छापा टाकला. ही चौकशी रविवारी ( 9 फेब्रुवारी ) रात्री उशिरा संपली. यानंतर रामराजे नाईक-निंबाळकर यांनी ठेवलेल्या स्टेटसमुळे नव्या राजकीय संघार्षाची सुरूवात झाली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रामराजेंचे नेमकं स्टेटस काय?
‘सुरूवात तुम्ही केली, शेवट मी करणारच…’, असे व्हॉट्सअॅप स्टेटस रामराजे नाईक-निंबाळकर यांनी ठेवले आहे. यात रामराजे यांनी कुणाचेही नाव घेतलेले नाही. पण, रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांनाच हा इशारा असल्याचे बोलले जात आहे.
रामराजे पुन्हा अजितदादांसोबत…
रामराजे पुन्हा अजितदादा यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या बैठकांना दिसले आहेत. मात्र, रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्यासोबत रामराजे यांचा कायमच ’36 चा आकडा’ आहे. रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि गोरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘गुडबूक’मध्ये आहेत. त्यामुळे राज्यात भाजपची सत्ता येतच रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि गोरे हे वचपा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे बोलले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर रामराजे यांच्या कुटुंबामागे चौकशांचा ससेमिरा लागल्याची चर्चा फलटणसह सातारा जिल्ह्यात आहे.