सातारा प्रतिनिधी | दादर-पंढरपूर-सातारा एक्स्प्रेसला चंद्रभागा एक्स्प्रेस नाव देवून सातारा येथून पंढरपूर-दादरसाठी दररोज एक्स्प्रेस सोडण्यात यावी, अशी मागणी सातारा जिल्हा रेल्वे प्रवासी संघ, सातारा रेल्वे स्टेशन सल्लागार समितीच्या सदस्यांया वतीने केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य रेल्वेचे मुख्य महाव्यवस्थापक, पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा येथून पंढरपूरसाठी 16 मार्च 2024 पासून सातारा-पंढरपूर-दादर एक्स्प्रेस रेल्वे सुरू झाली. ही रेल्वे सातारा येथून पंढरपूर व पुढे दादरला जात असल्याने सातारा रेल्वे स्टेशन टर्मिनल झाले आहे. सातारा येथून प्रत्येक सोमवार, मंगळवार व शनिवारी दुपारी 3.30 वाजता सुटून सातारा ते पंढरपूरपर्यंत 13 प्रमुख रेल्वे स्टेशनवर थांबून पंढरपूर येथे रात्री 9 वाजता पोहचते. पंढरपूर वरुन पुढे मुंबई दादरसाठी रात्री 9.10 वाजता सुटून दादर येथे सकाळी 6.35 वाजता पोहोचते. दादर येथून प्रत्येक सोमवार, शुक्रवार व रविवारी रात्री 11.55 वाजता सुटून पंढरपूर येथे सकाळी 8.10 वाजता पोहोचते.
पंढरपूर येथून सातारसाठी सकाळी 8.15 वाजता सूटून सातारा येथे दुपारी 2.10 ला पोहोचते. सातारा पंढरपूर दादर रेल्वे गाडी सातारा येथून दररोज पंढरपूर व दादरसाठी सोडल्यास वारकरी व प्रवाशांना फायदा होणार आहे. सातारा-पंढरपूर-दादर एक्सप्रेसला चंद्रभागा एक्स्प्रेस असे नाव देण्यात यावे, अशी मागणी सातारा जिल्हा रेल्वे प्रवासी संघाचे विकास कदम, किशोर शेंडे, मधुकर शेंबडे, हसमुख पटेल, राजेंद्र गलांडे, हेमंत जाधव, नितीन शिंदे, सुनील बर्गे, दत्तात्रय सुतार, योगेश मालाणी यांनी केली आहे.