सातारा प्रतिनिधी । सातारा महामार्गावरील कोरेगाव तालुक्यातील देऊर येथील रेल्वे फाटक क्रमांक ४७ हे सोमवारपासून (दि. ३) पासून तीन दिवसांसाठी बंद करण्यात येत आल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.
याबाबत वाठार स्टेशन येथील रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लोणंद- सातारा रेल्वे मार्गावरील देऊर रेल्वे फाटक क्रमांक ४७ हे रेल्वे रुळाच्या दुहेरीकरण व दुरुस्तीसाठी तसेच निरीक्षणासाठी सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून ते बुधवार (दि. ५) रोजी सायंकाळच्या सात वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. फाटक बंद असलेल्या तीन दिवसांसाठी सातारा ते लोणंद या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
लोणंद व फलटणकडून साताऱ्याकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने वाठार स्टेशनमधून पिंपोडे बुद्रुक – दहिगाव- देऊर किंवा वाघोली- अनपटवाडीमार्गे अंबवडे चौकातून सातारा दिशेने जातील. वाठार स्टेशनकडून कोरेगावला जाणारी सर्व प्रकारची वाहने तळीये- बिचुकले- गुजरवाडी- पळशीमार्गे पुढे जातील, तसेच सातारा बाजूकडून लोणंदला जाणारी वाहने अंबवडे चौकातून अनपटवाडी- वाघोली- पिंपोडे बुद्रुक- वाठार स्टेशन या मार्गावरून जातील. तरी सर्व वाहनधारकांनी तीन दिवसांसाठी पर्यायी मार्गाचा वापर करून वाहतूक सुरळीत करावी, असे आवाहन रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.