सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा बॅंकेच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ऊस पिकाचे शाश्वत उत्पादन वाढीसाठी प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील 6 हजार तरुण शेतकऱ्यांच्या एकरी उत्पादन वाढ करण्याची चळवळ राबविण्यात येणार आहे. यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी व जिल्हा बँकेत या संदर्भात नुकताच एक सामंजस्य करार करण्यात आला.
यावेळी बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, आ. बाळासाहेब पाटील, शिवरुपराजे निंबाळकर, प्रदीप विधाते, रामभाऊ लेंभे, ज्ञानदेव रांजणे, शेखर गोरे, सुरेश सावंत, लहुराज जाधव, कांचन साळुंखे, ऋतुजा पाटील, डॉ. एस. डी. मासालकर, बँकेचे अधिकारी, तसेच जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक उपस्थित होते.
यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी ऊस उत्पादन वाढ या पद्धतीचा देशातील पहिलाच उपक्रम जिल्हा बँकेच्या माध्यमातून राबवीत असल्याबद्दल आनंद वाटतो, असे नमूद केले. या वेळी विद्यापीठाचे नोडल अधिकारी डॉ. धर्मेंद्रकुमार फाळके यांनी मार्गदर्शन केले.
दरम्यान, सातारा जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी शाश्वत ऊस उत्पादनवाढीसाठी ऊस उत्पादक शेतकरी, कृषी विद्यापीठ राहुरी व जिल्ह्यातील साखर कारखाने यांची एकत्रित मोट बांधून नावीन्यपूर्ण उपक्रमाची रूपरेषा ठरविली. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून माती परीक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याची सहमती दर्शविली.
यावेळी आ. मकरंद पाटील व प्रभाकर घार्गे यांनी सूचना मांडल्या. बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. शेवटी बॅंकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी आभार मानले.