सातारा प्रतिनिधी । कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर नगरपालिकेच्या वतीने गुरुवारी दि. 28 रोजी आठवडी बाजारात कारवाई करण्यात आली. यावेळी पालिका कर्मचाऱ्यांनी प्लॅस्टिकच्या पिशव्या वापर व विक्री करत असलेल्या व्यावसायिक तसेच बेकरी व्यावसायिक, प्लास्टिकचा वापर करणाऱ्या भाजी विक्रेते, फळ विक्रेते, चिकन मटण दुकानवाले, मासे मासळी विक्रेते, मसाले विक्रेते यांना भेटी दिल्या. त्यांच्याजवळ असलेल्या प्लॅस्टिक पिशव्या तसेच वापर करत असलेल्या व्यापाऱ्याकडून सुमारे एक पोते 50 किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या.
यावेळी रहिमतपूर पालिकेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली रहिमतपुरात ‘माझी वसुंधरा अभियान 4.0’ व ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ अंतर्गत गुरुवारी मोहीम राबविण्यात आली. शहरात 100 टक्के प्लास्टिक बंदी मोहीम चळवळ रबिवण्यात येत आहे. पालिकेच्या प्लॅस्टिक बंदी पथकाने केलेल्या कारवाईमुळे प्लास्टिकचा वापर करीत असलेल्या व्यापारीवर्गामध्ये धडकी भरली आहे. रहिमतपूर शहरात 100 टक्के प्लॅस्टिक बंदीबाबत वेलोवेळी कायम गेली 5 वर्षे मोहीम व जनजागृती राबविण्यात येते आहे.
दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या आदेशानुसार व माझी वसुंधरा अभियान 4.0 व स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत शहरामध्ये मुख्याधिकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता उमेश घाडगे, शहर समन्वयक मेघराज, कर व प्रशासकीय अधिकारी आमने, लिपिक दादा साळुंखे यांच्यामार्फत आठवडी बाजारमध्ये सिंगल युज प्लास्टिक पिशवी व 120 मायक्रोनपेक्षा कमीचे हॅण्डलसह आणि हॅण्डलशिवाय प्लॅस्टिकच्या पिशव्या नॉन ओव्हन प्लास्टिक/पॉलीप्रोपलिन कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या.