सातारा प्रतिनिधी । सध्या पश्चायम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे रस्त्याच्या आणि घाटाच्या नागमोडी छोट्या रस्त्यांवर दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या खेडमधील रघुवीर घाटामध्ये रस्ता खचून रस्त्याला मोठे भागदाड पडण्याची घटना आज सकाळी घडली. रस्त्याचा एक भाग हजारो फूट खोल दरीत कोसळल्यामुळे सातारा जिल्ह्यातील घाटाच्या पलीकडील तब्बल ४० गावांचा संपर्क तुटण्याची भीती निर्माण झाली आहे.
रत्नागिरी जिल्हा आणि सातारा या दोन जिल्ह्यांना रघुवीर घाट जोडतो. रघुवीर घाट हा प्रमुख राज्य मार्गावरील घाट आहे. कोयना अभयारण्यामध्ये व कोयना बॅक वॉटर परिसरात सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि माढा तालुक्यात समाविष्ट असलेल्या शिंदी, वळवण, चाट, वाधावळे, लामज मोरनी, आरव, अकल्पे, तापोळा, याप्रमाणे लहान मोठी अशी ४० गाव घाटाच्या पलीकडे आहेत. त्यांचे दळणवळणाचे मुख्य साधन हे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड आणि चिपळूण हेच आहे.
घाटाची समुद्रसपाटीपासून ७६० मीटर उंची
पावसाळ्यात रघुवीर घाटात अनेक पर्यटक घाटाचे सौंदर्य न्याहाळत पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येतात. त्यातून मोठ्या प्रमाणात स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध हाेताे. घाटाची समुद्रसपाटीपासून ७६० मीटर उंची आहे. खोपी, शिंदी,वळवण,बामणोली मार्गे तापोळ्याकडून फेरीबोटीने पर्यटकांना महाबळेश्वरला जाता येते. याकरिता हा एक चांगला मार्ग आहे. निसर्ग पर्यटन करताना विविध प्रकारचे पक्षी, त्यांचे आवाज, विविध प्रकारचे लहान-मोठे प्राणी, सरपटणारे प्राणी, वाऱ्याचा सळसळणारा आवाज कानात घुमतो.