सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कोयना जलाशयातील दुर्गम व डोंगराळ भागात तराफा सेवा सुरु करण्यात आली होती. ती अचानक बंद झाल्याने अनेक स्थानिक वाहनचालक व पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागतात आहे. दुर्गम कोयना खोऱ्यात कोयना नदीच्या शिवसागर जलाशयातून वाहनांची पाण्यातून वाहतूक करण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेमार्फत तराफा सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, बामणोली, तापोळा भागातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या तराफाच्या पंख्याचा शाप्ट तुटून बंद तराफा पडला. रविवारी गाढवली बाजूला वाहने सोडून परत तापोळ्याकडे येत असताना हि घटना घडली.
जिल्हा परिषदेमार्फत सुरु करण्यात आलेल्या या तराफा सेवेद्वारे केळघर, तर्फ सोळशी, तापोळा व गाढवली दरम्यान छोट्या मोठ्या वाहनांची पाण्यातून वाहतूक केली जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गाव असलेल्या दरे व कांदाटी खोऱ्यात वाहने नेण्यासाठी या तराफ्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. त्यामुळे कोयना जलाशयावरील साताऱ्यातील दुर्गम व डोंगराळ भागात दळणवळणाचा कणा म्हणून तराफा वाहतूक समजली जाते. अचानक झालेल्या या बिघाडामुळे स्थानिक पर्यटकांसह अनेकांना याचा फटका बसला.
तराफ्याचे पाण्यात पडलेले शाप्ट व काही भाग काढले असून दुसरा पंखा शिल्लक असून सोमवारी आवश्यक असणाऱ्या भागांची जुळणी करून मंगळवारी सायंकाळपर्यंत तराफा सेवा पुर्ववत करण्याचा प्रयत्न राहील, अशी माहिती देण्यात आली असून हा भाग दुर्गम असून पर्यटक आपली वाहने ताराफ्यातून घेऊन जात असतात. स्थानिक साताऱ्याला जा – ये करण्यासाठी आपली वाहने घेऊन जातात. तराफा बंद झाल्याने परिसरातील दळनवळण बंद झाले आहे.