सातारा जिल्ह्यात रब्बीची ‘इतक्या’ टक्के झाली पेरणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने शेतकऱ्यांना जास्त उत्पादन घेता आले नाही. या पर्जन्यमानाच्या कमतरतेचा परिणाम रब्बी हंगामातील पेरणीवरही झाल्याचे पहायला मिळाले. जिल्ह्यात आतापर्यंत फक्त ६० टक्के म्हणजे सव्वा लाख हेक्टर इतक्या क्षेत्रात पेरणी झालेली असून गतवर्षी नोव्हेंबरअखेर ८१ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे.

सातारा जिल्ह्यात खरीप आणि रब्बी असे दोन प्रमुख पीक हंगाम घेतले जातात. यातील खरीप हंगाम हा रब्बीपेक्षा मोठा राहतो. खरीपातील जिल्ह्याचे सर्वसाधारण क्षेत्र हे २ लाख ८८ हजार हेक्टर होते. तर आता रब्बीची पेरणी सुरू झाली असून २ लाख १३ हजार २०९ हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आलेले आहे. यामध्ये ज्वारी क्षेत्र सर्वाधिक राहते. यंदा ज्वारीचे क्षेत्र १ लाख ३५ हजार ५३१ हेक्टर असून यानंतर गहू ३७ हजार हेक्टरवर, हरभरा २७ हजार ७५३, मका १० हजार २०९ हेक्टर क्षेत्र राहणार आहे.

आतापर्यंत ज्वारीची सुमारे ९५ हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झालेली असून पेरणीचे हे प्रमाण ७० टक्क्यांवर आहे. तर गव्हाची १२ हजार ४४२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. हे प्रमाण ३३ टक्क्यांवर जाते. आणखी काही दिवस गव्हाची पेरणी चालणारअसल्यामुळे गव्हाच्या पेरणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर हरभऱ्याची पेरणी सुमारे ११ हजार हेक्टरवर झाली असून हे प्रमाण ३९ टक्क्यांच्या आसपास आहे. मकेचीही पेरणी ७८ टक्के झाली आहे. शेतकऱ्यांनी ८ हजार हेक्टरवर मका पेरणी केली आहे. तर करडई, सूर्यफूल, तीळ, जवसचे क्षेत्र कमी राहते.

प्रमुख रब्बी तालुक्यात यंदा अशी झालीय पेरणी…

सातारा जिल्ह्यातील रब्बीतील सर्वाधिक क्षेत्र हे माण तालुक्यात ४६ हजार हेक्टरवर आहे. तर यानंतर फलटण ३१ हजार, खटाव ३० हजार हेक्टर राहते. कोरेगाव तालुक्यातही २१ हजार हेक्टरवर क्षेत्र आहे. या तालुक्यात रब्बी पेरणी कमी झालेली आहे. माणमध्ये आतापर्यंत २७ हजार हेक्टरवर पेरणी झाली असून हे प्रमाण ५८ टक्के इतके आहे. तर खटाव तालुक्यात ६७ टक्के पेरणी झाली आहे. २० हजार हेक्टरवर पीक घेण्यात आले आहे. फलटणला १२ हजार ५०० हेक्टरवर पेरणी झाली. टक्केवारीत हे प्रमाण ४० च्या वर गेलेले आहे. कोरेगावला १४ हजार हेक्टरवर पेरणी झाली असून याचे प्रमाण ६६ टक्के आहे. तर सातारा तालुक्यात ७८ टक्के, जावळी ६० टक्के, पाटण ७६, कराड ४३, खंडाळा तालुक्यात ५८, वाई ५७ आणि महाबळेश्वर तालुक्यात ९७ टक्के पेरणी पूर्ण झालेली आहे.