सातारा जिल्ह्यात तब्बल 1 लाख 30 हजार हेक्टरवर रब्बी ज्वारीची लागवड

0
291
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात पोषक वातावरणामुळे रब्बी हंगामातील शंभर टक्के पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक रब्बी ज्वारीची एक लाख ३० हजार १०१ हेक्टर लागवड झाली असून परतीचा तसेच बिगर मोसमी पाऊस झाल्याने ज्वारीची उगवण व वाढ झाली आहे. यामुळे रब्बी ज्वारीच्या उत्पादनाबाबत शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या आहेत.

जिल्ह्यात पावसाचा मुक्काम वाढल्याने खरीप पिकांचे नुकसान झाले होते. मात्र हा पाऊस रब्बी हंगामाच्या दृष्टिने फायदेशीर ठरला आहे. पोषक वातावरणामुळे मशागत तसेच पेरणीची कामे वेळेत सुरू झाली होती. यामुळे या हंगामात सरासरी क्षेत्राइतकी म्हणजे शंभर टक्के पेरणी झाली आहे.

रब्बीच्या अंतिम अहवालानुसार १०१.५८ टक्के पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक रब्बी ज्वारीचा वाटा आहे. जिल्ह्यात सर्वाधिक रब्बी ज्वारीचे एक लाख ३५ हजार ५३१ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी एक लाख ३० हजार१०१ हेक्टर लागवड झाली आहे. जिल्ह्यात महाबळेश्वर तालुक्याचा अपवाद वगळता इतर सर्वच तालुक्यात ज्वारीची पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक माण तालुक्यात ३६ हजार ५४१ हेक्टर पेरणी झाली आहे. ज्वारीच्या लागवडीनंतर अनेक ठिकाणी एक ते दोन दमदार पाऊस झाले होते. यामुळे ज्वारीची उगणवण, वाढ दमदार झाली आहे. सध्या थंडीचे प्रमाणही चांगले असल्याने ज्वारीस फायदेशीर ठरत आहे.

तालुकानिहाय रब्बी ज्वारी पेरणी (क्षेत्र हेक्टरमध्ये)

सातारा : १०,२१२
जावळी : ९,१७३
कराड : ५,१९३
कोरेगाव : १३,८८०
खटाव : २०,९८७
माण : ३६,५४१
फलटण : १३,९०४
खंडाळा : ८१००
वाई : ८,११४