कराड प्रतिनिधी । स्वच्छ, सुंदर बसस्थानक स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत राज्यात अव्वल आलेल्या कराड आगाराने स्वच्छतेत चांगलीच सुधारणा केली आहे. मात्र, नादुरूस्त गाड्यांमुळे ग्रामीण प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. कोणत्या ना कोणत्या रस्त्याला एसटी बंद पडल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच आगाराच्या वर्कशॉपमध्ये दुरूस्तीसाठी गाड्यांची रांग लागल्याचे दिसून येत आहे. भंगार झालेल्या गाड्यांना चालक-वाहक देखील कंटाळले आहेत.
कराड हे ग्रामीण भागातील राज्यात सर्वाधिक गर्दीचं आणि उत्पन्न मिळवून देणारं आगार आहे. लांब पल्ल्याच्या सर्व गाड्या कराड आगारात येतात. असा लौकिक असणाऱ्या या आगारातील सर्वच एसटी बसेस नादुरूस्त आहेत. प्रत्येक गाडीमध्ये काही ना काही बिघाड आहे. त्यामुळे भर रस्त्यात गाड्या बंद पडत आहेत. सध्या आगारात फक्त 85 बसेस आहेत. ज्या गाड्या भंगारात काढल्या. त्या जागी नव्या गाड्याही देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे एसटी गाड्यांच्या फेऱ्याचं वेळापत्रक बिघडलं आहे.
प्रवाशांवर ताटकळत बसण्याची वेळ
अपुऱ्या गाड्यांमुळे ग्रामीण भागातील प्रवाशी गाडीची वाट पाहत तासन् तास फलाटावर ताटकळत बसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. गाडी अभावी अनेक फेऱ्या रद्द केल्या जात आहेत. त्यामुळे खासगी वडापने प्रवास करण्याची वेळ वयस्कर प्रवाशांवर येत आहे. या बाबींकडे आगार व्यवस्थापक गांभीर्याने पाहत नसल्याची तक्रार कर्मचारीच खासगीत करत आहेत.