सातारा प्रतिनिधी | खटाव तालुक्यातील पुसेगाव येथील प. पू. श्री सेवागिरी महाराजांच्या 76 व्या पुण्यस्मरणानिमित्त वार्षिक यात्रेस शनिवारी पालखी व मानाचा झेंड्याच्या भव्य मिरवणुकीने भक्तिमय आणि उत्साही वातावरणात सुरुवात झाली. शनिवार, दि 6 ते मंगळवार, दि. 16 या कालावधीत शासकीय विद्यानिकेतनच्या परिसरात आणि सातारा-पंढरपूर रस्त्याच्या दुतर्फा यात्रा भरण्यास सुरूवात झाली आहे.
पुसेगाव यात्रेस दरवर्षी महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, गुजरात व आंध्र प्रदेशसह इतर राज्यांमधून नऊ ते दहा लाख भाविक हजेरी लावतात. श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती प. पू. सुंदरगिरी महाराज, आमदार महेश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, ट्रस्टचे चेअरमन रणधीर जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, संतोष उर्फ बाळासाहेब जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव यांच्या हस्ते सकाळी 9 वाजता मानाचा झेंडा व श्री सेवागिरी महाराजांच्या पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते.
पूजनानंतर झेंडा व पालखी मिरवणुकीला मंदिरापासून सुरुवात झाली. भाविक आणि ग्रामस्थांनी जागोजागी मानाचा झेंडा व पालखीचे मनोभावे दर्शन घेत ‘श्री सेवागिरी महाराज की जय’च्या घोषणा दिल्या. मुख्य बाजारपेठेतून निघालेल्या श्री सेवागिरी महाराजांच्या मानाचा झेंडा व पालखी मिरवणुकीसमोर श्री हनुमानगिरी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, श्री सेवागिरी विद्यालय, कला व वाणिज्य महाविद्यालय, इंदिरा गांधी कन्या प्रशाला, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी, झांजपथक व लेझीमपथके सहभागी झाली होती.