सातारा प्रतिनिधी | केंद्रीय गृह मंत्रालयाने 2023 मध्ये केलेल्या सर्वेक्षणात सातारा जिल्ह्यातील पुसेगाव पोलिस ठाण्याने सलग दुसर्यांदा महाराष्ट्रात नंबर वनचे स्थान मिळवले आहे. राज्यात बेस्ट ठरलेल्या पुसेगाव पोलिस ठाण्याचा शनिवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
तत्कालीन एसपी अजयकुमार बन्सल, सध्याचे एसपी समीर शेख, तत्कालीन डिवायएसपी गणेश किंद्रे, सध्याचे पंढरपूरचे पोलिस निरिक्षक विश्वजीत घोडके यांच्या कार्यकाळात केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सर्वोत्कृष्ट पोलिस ठाणे प्रतियोगितेत 2022 साली पुसेगाव पोलिस ठाणे राज्यात अव्वल आणि देशात टॉप टेनमध्ये आले होते. तत्कालीन पोलिस उपनिरिक्षक बाळासाहेब लोंढे यांच्या कार्यकाळात पुन्हा एकदा 2023 सालासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुसेगाव पोलिस ठाण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता.
स्पर्धेचे सर्व निकष पूर्ण करण्यासाठी एसपी समीर शेख, तत्कालीन एसपी अजयकुमार बन्सल, डिवायएसपी किंद्रे, पोलिस उपनिरीक्षक लोंढे, सपोनि संदीप शितोळे, सपोनि चेतन मछले आणि सध्याचे सपोनि संदीप पोमण यांच्यासह सहकारी कर्मचारी, अधिकार्यांनी प्रयत्न केले होते. प्रसिद्धी माध्यमे, पुसेगाव पोलिस ठाण्याच्या अखत्यारितील नागरिकांच्या प्रयत्नांना यश येवून सलग दुसर्यांदा केंद्रीय गृह मंत्रालयाच्या पडताळणीत पुसेगाव पोलिस ठाणे राज्यात अव्वल ठरले आहे.
एएसआय सुरेश चव्हाण, आनंदराव जगताप, सचिन माने, सुधाकर भोसले, सचिन जगताप, अमृता चव्हाण आणि सहकार्यांनीही पोलिस ठाण्याचे कामकाज अपटुडेट ठेवण्यात परिश्रम घेतले होते. पुसेगाव पोलिस ठाण्यात कर्तव्य पार पाडताना यापूर्वी नंदकुमार पिंजण, दयानंद ढोमे, राजेंद्र सावंत्रे, धनंजय पिंगळे, विश्वजीत घोडके, संभाजीराव गायकवाड, उमेश तावसकर, घाडगे, संजय बोंबले या अधिकार्यांनी पुसेगाव पोलिस ठाण्याचा कारभार समाजाभिमुख पोलिसींगद्वारे चालवण्याची परंपरा सुरु ठेवली होती. त्यानंतरच्या सर्व अधिकार्यांनी त्याच पावलावर पाऊल टाकत वाटचाल केल्याने पुसेगाव पोलिस ठाण्याला हा सर्वोच्च पुरस्कार सलग दुसर्यांदा प्राप्त झाला आहे. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल पुसेगाव पोलिस ठाण्याचे मान्यवरांकडून कौतुक करण्यात येत आहे