सातारा प्रतिनिधी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती, कट्टर शिवसैनिक पुरुषोत्तम जाधव यांनी शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख पदाचा व शिवसेना सदस्यत्वाचा आज वर्षा निवासस्थानी जाऊन राजीनामा दिला असून, वाई -खंडाळा -महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून रणांगणात उतरणार आहे, असे पुरुषोत्तम जाधव यांनी जाहीर केले आहे.
पुरुषोत्तम जाधव यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे की, गेली अनेक वर्ष युतीच्या नावाखाली सातारा लोकसभा व वाई -खंडाळा -महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघ मित्र पक्षाला बहाल केला जात आहे. त्यामुळे आमच्यासारख्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कडवट विचारसरणीच्या सर्वसामान्य शिवसैनिकाला निवडणुकीची वारंवार तयारी करूनही लढण्याची संधी डावलली जात आहे. माझ्याबरोबरच्या शिवसैनिक व मतदारांचे सातत्याने खच्चीकरण होत आहे. त्यामुळेच मी माझ्या शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख पदाचा व शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा सादर करीत आहे.
पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानताना जाधव म्हणाले, की शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख व जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदाची जबाबदारी दिली, त्याबद्दल सदैव आभारी राहीन. पुरुषोत्तम जाधव खंत व्यक्त करताना म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना पक्ष जिल्ह्यात वाढवण्यासाठी जिल्हाभर फिरत संघटनवाढ केली आहे. असे असताना पक्षाकडून कोणती दखल घेतली जात नाही. लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असताना मला माघार घेण्यास सांगून महामंडळाचे अध्यक्ष पद देण्याचे कबूल करूनही ते देण्यात आले नाही. त्यामुळे माझ्यासह कार्यकर्त्यांचं खच्चीकरण होत होते.
प्रत्येक वेळी वरिष्ठ पातळीवरून डावलल जात आहे. खंडाळा हा दुष्काळी पट्ट्यातील तालुका. गेल्या अनेक वर्षांपासून या तालुक्याला राजकीय नेतृत्व नव्हतं. आम्ही ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रत्येक वेळेस युतीच्या नावाखाली डावलल जात होत. आता विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून निवडणूक पक्षाच्या वतीने लढण्याची तालुक्याला संधी आली होती, तीही घराणेशाही व एकाधिकारशाहीमुळे डावलण्यात आल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
वाई -खंडाळा -महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात घराणेशाही व एकाधिकारशाही थारा दिला जात आहे. त्यामुळे आमच्यासारख्या सच्चा शिवसैनिकाला निवडणुकीत डावलल जात होते. गेली अनेक वर्षे विरोध केलेल्या आमदारांच्या उमेदवारी विरोधात नाराजी व्यक्त करून हा निर्णय कार्यकर्त्यांसमवेत विचारविनिमय करून घेतला आहे. या घडीला माझ्याबरोबर संघटित केलेला माझा मतदार आणि शिवसैनिक पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे मी आता थांबणार नसून अपक्ष निवडणूक लढवणार आहे.
ही माझी ठाम भूमिका आहे, यासाठी जय्यत तयारीसुद्धा झाली आहे. गेल्या वर्षभर मतदारसंघातील गावोगावी भेटी देऊन जनमत आजमावूनच मी निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. मी अपक्ष उमेदवारी जाहीर केली असून त्याला मतदारांचा, कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे. अभी नही तो कभी नही, हे धोरण ठेवूनच मी आता निवडणूक रणांगणात उतरलो आहे, असे शेवटी पुरुषोत्तम जाधव म्हणाले.