सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा मतदार (Satara Lok Sabha Election 2024) संघासाठी महायुतीकडून अद्यापही उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नसली तरी साताऱ्यात अनेक राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. आज एकीकडे भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदारकीच्या उमेदवारीबाबत आपली भूमिका मांडली आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम जाधव यांनी भाजप आ. शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली आहे. त्यांच्या भेटीचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. मात्र, या भेटीवेळी दोघांच्यात नेमकी कोणत्या विषयांवर कमराबंद चर्चा झाली? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
सातारा लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराची घोषणा झाली नसली तरी साताऱ्यातील भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे सातारा जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम जाधव यांनी भाजप आमदार शिवेंद्रराजे यांच्या सुरुची या निवासस्थानी जाऊन आज भेट घेतली. दोघांच्या झालेलया भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून जाधव यांनी आजच शिवेंद्रराजेंची भेट का घेतली? असा प्रश्न सध्या कार्यकर्त्यांमधून उपस्थित केला जात आहे.
शिंदे गटाच्या पुरुषोत्तम जाधवांनी घेतली आ. शिवेंद्रराजेंची भेट; कमराबंद नेमकी काय केली चर्चा? pic.twitter.com/8DUNFDGomL
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) March 16, 2024
दरम्यान, पुरुषोत्तम जाधव आणि आ. शिवेंद्रराजे यांच्या भेटीने खासदार उदयनराजेंची डोकेदुखी वाढणार का? अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. खा. उदयनराजेंनी उमेदवारीबाबत केलेलं महत्वाचं विधान आणि पुरुषोत्तम जाधव यांनी आ. शिवेंद्रराजे यांची घेतलेली भेट यामुळे साताऱ्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.