सातारा जिल्ह्यात महायुतीला लवकरच बसणार धक्का; शिंदेंच्या गटाचा ‘हा’ बडा नेता फुंकणार तुतारी?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची काल घोषणा करण्यात आली. निवडणुकीची घोषणा झाली असली तर विविध पक्षानी मतदार संघात मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. राज्यातील विधानसभा मतदार संघापैकी सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघातील घडामोडीना वेग आला आहे. जिल्ह्यातील घडामोडी पाहता महायुतीला झटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना ( शिंदे गट) पक्षाचे जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनी याबाबत आता स्पष्ट संकेत दिले आहेत. शिंदे गटाचे सातारा जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी वाई विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत इच्छा व्यक्त केली आहे. मला संधी दिली तर संधीच सोनं करेन, असं जाधव यांनी म्हंटलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी नुकताच एका वृत्त वाहिनीशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आम्ही पूर्ण मतदारसंघात जनसंवाद यात्रा काढली. यावेळी सध्याचे आमदार आहेत त्यांच्याबाबत जनतेमध्ये असंतोष असल्याचे दिसून आले. त्यांनी सगळी पद घरातच पाहिजेत अशी भावना आहे त्यामुळे त्यांना आता प्रचंड विरोध होत आहे. एकनाथ शिंदे जेव्हा बाहेर तेव्हापासून मी त्यांच्यासोबत आहे.

तेव्हा त्यांनी मला वाई विधानसभेची बांधणी करा म्हणून सांगितली, तशी मी तयारीही केली आहे. पण अचानक अजित पवार महायुतीमध्ये आले त्यामुळे आता विद्यमान आमदार म्हणून त्यांनाच संधी मिळत आहे. मी लोकसभा निवडणूकही लढणार होतो पण मला देवेंद्र फडणवीस यांनी थांबवलं. त्या निवडणुकीत मी एक ते दीड लाख मत घेतली असती तर महायुतीचे उमेदवार धोक्यात आले असते. दरवेळी मला थांबवलं जात, आम्ही सर्वसामान्यांनी राजकारणात यायचं की नाही असा प्रश्न आम्हाला पडला असल्याचे जाधव यांनी यावेळी म्हटले.

…तर मी संधीच सोनं करेन

सध्या वाई मतदार संघात अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटील यांच्या विरोधात शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवार दिला जाणार हे नक्की. यासाठी त्यांची शोधाशोध सुरु आहे. अशात पुरुषोत्तम जाधव यांनी देखील निवडणूक लढविण्याचे साकेत दिले आहेत. यावेळी ते म्हणाले की, आतापर्यंत खंडाळा तालुक्याला प्रतिनिधित्व मिळालेलं नाही, मी गेली वीस-बावीस वर्ष संघर्ष करतोय. माझ्यावर कोणताही आरोप नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी मी एक सक्षम पर्याय होऊ शकतो. मी लढणार आहे, मला संधी हवी आहे. मला संधी दिली तर संधीच सोनं करेन, असं सांगत पुरुषोत्तम जाधव यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिले.