सातारा प्रतिनिधी । उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत नुकताच वाई येथे जनसन्मान मेळावा पार पडला. या मेळाव्यात अजितदादांनी पुन्हा एकदा मकरंद पाटील (Makarand Patil) यांना आवाहन वाई तालुक्यातील जनतेला केले. त्यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे सातारा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी थेट आमदार मकरंद पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. “एकाच घरामध्ये सर्व पदे मग वाई मधील इतर कार्यकर्ते मेले आहेत का? असा सवाल करीत शिवसेना नेते पुरुषोत्तम जाधव यांनी (Purushottam Jadhav) पाटील यांच्यावर टीका केली आहे.
जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी जनसंवाद यात्रेत नुकताच नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, कर्तृत्व नसताना फक्त घराणेशाहीच्या नावावर निवडून येणाऱ्या वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभेच्या आमदाराला आता घरी बसण्याची वेळ आली आहे.
स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. आबासाहेब वीर यांचे नाव घ्यायचे आणि त्यांचेच सत्तेचे विकेंद्रीकरणाचे विचार मोडीत काढून एकाच घरात सगळ्या सत्ता घेऊन जनतेला झुलवत ठेवले आहे. झुंडशाही करणाऱ्या विरोधात आता जनताच पेटून उठली आहे. आता सर्व पक्षातील विरोधकांनी एकच मोट बांधली असून परिवर्तन निश्चित आहे, असा विश्वास शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी व्यक्त केला