सातारा प्रतिनिधी | वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात माझ्याच घरात सर्व सत्ता घेऊन विद्यमान आमदारांनी लोकशाहीची थट्टा चालवली आहे. मीच आमदार, माझाच भाऊ खासदार, जिल्हा बँकेचा चेअरमन देखील आमच्याकडे, मीच दोन्ही साखर कारखान्याचा चेअरमन, आम्हीच बाजार समितीचे संचालक, आम्हीच नाहं सरपंच… अशा ‘मी’ पणाच्या नादात विद्यमान आमदारांनी सत्तेचे केंद्रीकरण करून मतदार संघात दहशत माजवली आहे. मात्र मी संघर्षनायक आहे, जनतेच्या कल्याणासाठी गेली २२ वर्षे संघर्ष करतोय. आता घराणेशाहीची पाटीलकी मोडीत काढण्यासाठी वाई, खंडाळा महाबळेश्वर विधानसभेच्या ‘पॅरासिट मैदानात उतरलो आहे, असा इशारा शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी दिला.
महाबळेश्वरच्या कोयना खोऱ्यात वाळणे (ता. महाबळेश्वर) येथील जनसंवाद यात्रा मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी तळदेव व कोयना खोऱ्यातील वळणे, आहिर, गाढवली या गावातील नागरिकांशी संवाद साधला. कोयना खोऱ्यातील २२ गावातील नागरिक महिलांनी जनसंवाद यात्रेचे स्वागत केले.
यावेळी शिवसेना महाबळेश्वर तालुका प्रमुख संजय शेलार, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाबळेश्वर निमंत्रित सदस्य चंदू गुरुजी सपकाळ, लहुजी शक्ती सेना सातारा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव, शिवसेना खंडाळा तालुका प्रमुख भूषण शिंदे उपस्थित होते.
पुरुषोत्तम जाधव म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कोयना व कांदाटी खोऱ्यात मोठा विकास निधी व आरोग्य सेवा पोहचल्या आहेत. अनेक कामे प्रगती पथावर आहेत. या भागातील पर्यटन वाढीसाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील असून आता दुर्गम भागातील युवकांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.