‘बळीराजा’च्या पंजाबराव पाटलांचे पंतप्रधान मोदींना पत्र; दिला थेट ‘जंतरमंतर’वर आंदोलनाचा इशारा

0
1

कराड प्रतिनिधी । केंद्र सरकारने तत्काळ साखर निर्यात बंदी उठवावी, इथेनॉलसाठी उसाच्या रसाला वापरण्यास कारखान्यांना परवानगी द्यावी, साखरेचा हमीभाव चाळीस रुपये प्रतिकिलो करावा, उसाची एफआरपी बेस पूर्वीप्रमाणे साडेआठ टक्के रिकव्हरी करण्यात यावा आणि स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी तातडीने करावी. अन्यथा १० जानेवारीला बळीराजा संघटना दिल्लीतील जंतर मंतर येथे शेतकऱ्यांना बरोबर घेऊन बेमुदत उपोषण सुरू करू, असा इशारा संघटनेचे संस्थापक पंजाबराव पाटील यांनी पत्राद्वारे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला.

बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक पंजाबराव पाटील यांनी पंतप्रधान मोदींना पाठवलेल्या पत्रात म्हंटले आहे की, सध्या देशातील शेतकरी पाण्यातून बाहेर काढलेल्या माशाप्रमाणे तडफडत आहे आणि आपल्याला त्यांची दयामायय सुद्धा येताना दिसत नाही जीवनावश्यक नावाच्या कायद्याखाली अजून किती दिवस खाणाऱ्यांचा विचार करणार आहात कधीतरी देशाला जगवणाऱ्या उन्हातानात राबणाऱ्या शेतकऱ्यांचा विचार करणार आहात की नाही आज रोजी शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकवलेल्या शेतीमालाला मातीमोल भाव मिळत आहे. याची आपल्याला जाणीव येत नाही का आज रोजी शेतकऱ्यांना उत्पादन खर्च सुद्धा मिळत नाही जगण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे शेतकरी बँकेचे सावकारांचे कर्ज घेऊन शेती करत आहे.

दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढतच आहे याला आपल्या सरकारची चुकीची धोरणे कारणीभूत आहेत आपण सत्तेवर येताना शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे व स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन देशातील शेतकऱ्यांना दिलेले होते आज दहा वर्षे आपण सत्तेत आहात परंतु एकही आश्वासन आपण पाळलेले नाही शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये देऊन आपण त्यांना गुलाम बनवणार आहात का हा प्रश्न आहे आज देशात महिन्याला एक लाख रुपयापेक्षा जास्त पगार घेणारे सुद्धा आणि महिना तीन ते सहा हजार रुपये उत्पन्न असणारे गोरगरीब लोक एकाच भावाने किमतीने सर्व अन्नधान्य खरेदी करत आहेत.

हे गरीब लोकांना शक्य आहे का याचा आपण विचार कधी करणार आहात की नाही सध्या महाराष्ट्रात साखर कारखाने सुरू झालेले आहेत मागील दहा वर्षात उसाचा भाव वाढलेला नाही आणि उसाचा उत्पादन खर्च या काळात दुपटीने वाढलेला आहे याला केंद्र सरकारचे चुकीचे धोरण कारणीभूत आहे साखरेची निर्यात बंदी केल्यामुळे तसेच इथेनॉल साठी उसाच्या रसाचा वापर करण्यास बंदी केल्यामुळे आणि साखरेचा हमीभाव कमी केल्यामुळे आणि उसाच्या एफ आर पी बेस मध्ये साडेआठ टक्क्यावरून साडेदहा टक्क्यावर रिकवरी बेस केल्यामुळे आज शेतकऱ्यांना उसाचा दर योग्य मिळत नाही तरी सरकारने तात्काळ साखर निर्यात बंदी उठवावी, अशी मागणी आम्ही पंतप्रधान मोदी यांना पाठवलेल्या पत्रातून निवेदनाव्दारे केली आहे.

आमच्या पत्रातील मागण्याची पंतप्रधान मोदींनी दखल घ्यावी : पंजाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांबाबत बळीराजा शेतकरी संघटनेकडून आतापर्यंत अनेक आंदोलने करण्यात आलेली आहे. त्याची राज्य सरकारकडून देखील दाखल घेण्यात आली आहे. आता आम्ही १० जानेवारी रोजी दिल्ली येथील ‘जंतर मंतर’वर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून पंतप्रधान मोदी यांना इशाऱ्याचे निवेदन पत्राद्वारे पाठवले असल्याची प्रतिक्रिया बळीराजा संघटनेचे संस्थापक पंजाबराव पाटील यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली आहे.