साखर कारखान्यांचे धुरांडे पेटू देणार नाही; बळीराजा संघटनेच्या पंजाबराव पाटलांचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | ऊसाला गत गळीत हंगामाचा 500 रुपयांचा दुसरा हप्ता साखर कारखानदारांनी दिवाळीपूर्वी द्यावा. तसेच आगामी गळीत हंगामाची पहिली उचल 4 हजार रुपये मिळाली पाहिजे. दिवाळी सणाला 500 रुपयांचे बिल न दिल्यास साखर कारखान्यांची धुरांडी पेटू देणार नाही, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिला.

कराड तालुक्यातील कार्वे येथे बळीराजा शेतकरी संघटनेचा शेतकरी मेळावा, पत्रकार सन्मान सोहळा व पदाधिकारी निवडीचा संयुक्तिक कार्यक्रम पंजाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच पार पडला.

यावेळी गेल्या हंगामातील थकीत रक्कम, आगामी हंगामामध्ये ऊसाला चार हजार रुपयांचा दर मिळण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी बैठकीत विश्वास जाधव यांची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व आनंदराव थोरात यांची कराड तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, युवा अध्यक्ष गणेश शेवाळे, उत्तमराव खबाले, सुनील कोळी, उत्तमराव पाटील, पोपटराव जाधव, आबा शेवाळे, दिगंबर जगताप यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. पंजाबराव पाटील आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.