कराड प्रतिनिधी । अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज संसदेत देशाचे अंतरिम बजेट सादर केलं. आपल्या भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी मागील १० वर्षात मोदी सरकारने देशातील जनतेसाठी केलेल्या कामाचे वाचन केलं. आमचं सरकार समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करत असून २०४७ पर्यंत आपण विकसित भारत होऊ असं सीतारामन यांनी म्हंटल. मात्र, केंद्राच्या अर्थसंकल्पावर बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना परखड प्रतिक्रीया दिली आहे. देशातील गरीब शेतकऱ्यांना गृहीत धरून सादर केलेला अर्थसंकल्प म्हणावा लागेल सत्तेची मस्ती काय असते ती या अर्थसंकल्पातून दिसत असल्याचे पाटील यांनी म्हंटले आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत देशाचे अंतरिम बजेट सादर केल्यानंतर त्यावर बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी संवाद साधत प्रतिक्रिया दिली. यावेळी पाटील म्हणाले की, एकीकडे साखर कांदा निर्यात बंदी करून व तेलाची मोठ्या प्रमाणात आवक करून तेलबिया उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना देशोधडीला लावले. मोदी सरकार फक्त गोड बोलून शेतकऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु येणाऱ्या काळात शेतकरी फसणार नाही तर सत्तेची मस्ती असणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे. यासाठी यंदाच्या 2024 वर्षीच निवडणुकीत मोदी सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
कृषी क्षेत्रासाठी सीतारामन यांनी केल्या ‘या’ घोषणा
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केले. यावेळी त्यांनी कृषी अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रावरही भर देण्यात आला असल्याचे म्हंटले. दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक कार्यक्रम आखला जाणार असल्याची घोषणा सीतारामन यांनी यावेळी केल्या. PM Kisan योजनेतून 11.8 कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत देण्यात आली आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. तसेच 4 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकवीमा योजनेचा लाभ दिला आहे. दुग्ध उत्पादकांच्या मदतीसाठी योजना आखण्यात येणार आहे. तसेच शेतीसाठी आधुनिक साठवणूक यंत्रणेवर भर देण्यात आला आहे. आत्तापर्यंत 4 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विम्याचा फायदा झाला आहे. तर 80 कोटी लोकांना मोफत धान्यवाटप करण्यात आलं आहे. तर 390 कृषी विद्यापीठं सरकारनं सुरु केली आहेत. तेलबियांमध्ये देश आत्मनिर्भर व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. सरकार 5 इंटीग्रेटेड अॅक्वा पार्क्स उघडणार आहे. तसेच मोहरी आणि भुईमूग लागवडीलाही प्रोत्साहन देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री सीतारामन यांनी केली.