कराड प्रतिनिधी । मागील 50 वर्षांमध्ये घडली नाही अशी घटना सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. आषाढ महिना संपत आला तरी सुद्धा पावसाचा जोर दिसत नाही. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या ठिकाणी पेरणी केलेली उगवण उगवण्या इतपत सुद्धा पाऊस झालेला नाही. शेतकरी प्रत्येक वर्षी कर्ज काढून शेतीची मशागत व पेरणी करतो. यावर्षी सुद्धा कर्ज काढून शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, पाऊसच पडत नसल्यामुळे त्याच्यावर दुबार पेरणीच संकट घोंगावताना दिसत आहे. त्यामुळे शेतकरी वाचवायचा असेल तर त्याचे चालू पीक कर्ज पूर्णपणे माफ करावे व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी 25 हजार रुपये प्रमाणे अनुदान तात्काळ देण्याची व्यवस्था यावी, अशी महत्वाची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे थेट पत्राद्वारे केली असल्याची माहिती बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली.
पंजाबराव पाटील म्हणाले की, आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे काही महत्वाच्या मागण्या केलेल्या आहेत. सध्या पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येताना दिसत आहे. पाऊसच नसल्यामुळे येणाऱ्या काळात जनावरांच्या चाऱ्याचा सुद्धा प्रश्न निर्माण होणार आहे.आपण महाराष्ट्र राज्याचे एक मुख्यमंत्री आहात. राज्याला एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री लाभले आहेत. मात्र, राज्याचा पूर्ण कामकाज आपल्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. शेतकरी असो किव्हा सर्वसामान्य नोकरदार वर्ग यांच्याबाबत जे काही निर्णय घेतले जातात ते आपल्या आदेशानेच घेतले जातात.
शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या आपल्या सरकारकडून शेतकऱ्यांच्या मुलांची सर्व प्रकारची शैक्षणिक फी माफ करावी. पावसाअभावी अनेक पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तरी आपण येणाऱ्या संकटाचा गांभीर्यपूर्वक विचार करून तात्काळ बैठक घ्याव्यात आणि यावर योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने पत्राद्वारे केली असल्याची माहिती पंजाबराव पाटील यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली.