कराड प्रतिनिधी । पश्चिम महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून राज्य सरकारने बाधित शेतकऱ्यांना एक एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, मागील 50 वर्षामध्ये शेतकऱ्यावर अशी वेळ आलेली नव्हती गेल्या 25 मे पासून आजपर्यंत सतत पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी करता आलेली नाही. त्यामुळे सरकारने याचा विचार करून शेतकऱ्यांचे पीक कर्ज पूर्ण माफ करावे आणि झालेली नुकसान भरपाई म्हणून प्रति एकरी ५० हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.
पंजाबराव पाटील यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी नुकताच संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, अजून पाऊस थांबलेला नाही आणि कधी थांबेल सांगता येत नाही तसेच सध्या शेतीची मशागत पेरणी करण्यासाठी ट्रॅक्टर यांत्रिक अवजारे याचा उपयोग केला जात आहे. येणाऱ्या काळात ट्रॅक्टर शेतामध्ये पेरणीसाठी जाणे शक्य नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्यावर पेरणीचे संकट उभे राहिले आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून खाते, बी-बियाणे खरेदी केली आहेत. खाते आणि बियाणे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केलेला आहे. सरकारने याचा विचार करून शेतकऱ्यांचे पीक कर्ज पूर्ण माफ करावे.
तसेच अतिवृष्टीमुळे झालेली मोठ्या प्रमाणातील नुकसान भरपाई म्हणून प्रति एकर पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत तरच शेतकरी या संकटावर मात करतील. शेतकरी आणि संघटनेची मागणी सरकारने मान्य न केल्यास बळीराजा शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल याची नोंद घ्यावी, असे पाटील यांनी म्हटले आहे.