कराड प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअलद्वारे देशातील १२ ‘वंदे भारत’ एक्सप्रेस रेल्वेचे काल लोकार्पण करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्राला ३ ‘वंदे भारत’ एक्सप्रेस रेल्वे मिळाल्या आहेत. दरम्यान, पुण्याला मिळालेल्या पहिल्या ‘वंदे भारत’ एक्सप्रेस रेल्वेचेही लोकार्पण करण्यात आले असून या कार्यक्रमाअंतर्गत कराड – ओगलेवाडी रेल्वे स्थानकावर या ‘वंदे भारत’ एक्सप्रेसचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्यासह पदाधिकारी तसेच रेल्वे कर्मचारी यांनी वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. तसेच
ओगलेवाडी (कराड) रेल्वेस्थानक ते सातारा रेल्वेस्थानक असा प्रवास केला.
पुणे ते हुबळी आणि पुणे ते कोल्हापूर या मार्गादरम्यान ही एक्सप्रेस धावणार आहे. पुण्याला मिळालेल्या वंदे-भारत एक्स्प्रेसचा फायदा पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राला होणार असून यामुळे पुणे, सातारा, मिरज, सांगली आणि कोल्हापूर भागातील दळणवळण भक्कम होण्यास हातभार लागणार आहे. तसेच अर्थकारणालाही गती मिळणार आहे.