सातारा,सांगलीसह कोल्हापूरच्या प्रवाशांची होणार सोय; पुणे-बिकानेर एक्सप्रेस धावणार मिरजपर्यंत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड -पुणे-बिकानेर-पुणे साप्ताहिक एक्सप्रेसचा मिरजपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना आता मिरजमधून थेट बिकानेर जाण्यासाठी नवीन एक्सप्रेस उपलब्ध झाली आहे. या एक्सप्रेसमुळे सातारा, सांगली आणि कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांची मोठी सोय झाली असल्याची माहिती रेल्वे सल्लागार समिती सदस्य गोपाल तिवारी यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली.

तिवारी यांनी नुकताच हॅलो महाराष्ट्र शी संवाद साधला. यावेळी सुरू झालेल्या एक्सप्रेसबाबत बोलताना ते पुढे म्हणाले, रेल्वे खात्याने बिकानेर पुणे साप्ताहिक एक्सप्रेस मिरजेपर्यंत सुरू केली होती. मात्र, ही गाडी मिरजेतून पुण्यापर्यंत, पुण्यापासून बिकानेर पर्यंत वेगवेगळ्या गाडी क्रमांकाने धावत होती. त्यामुळे मिरजेतून पुण्यापर्यंत व पुण्यातून बिकानेरपर्यंत वेगवेगळे तिकीट घ्यावे लागत होते.

ही गाडी एकाच क्रमांकाचे सोडण्याची मागणी पुण्यात झालेल्या रेल्वेच्या समितीच्या बैठकीत केली होती. आमच्या मागणीची दखल घेत रेल्वेकडून २०४७५ आणि २०४७६ या क्रमांकाची गाडी मिरज बिकानेर एक्सप्रेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाडीला वेगवेगळ्या तिकिटाची गरज नाही.

पुणे-बिकानेर-पुणे एक्सप्रेस बिकानेरवरून सोमवारी सकाळी साडेसात वाजता निघेल व दुसऱ्या दिवशी मंगळवारी ही गाडी दुपारी पावणेदोनला मिरजेला पोहोचेल. मिरजेतून ही गाडी दर मंगळवारी दुपारी सव्वादोन वाजता निघेल आणि बिकानेरला बुधवारी रात्री आठ वाजुन ४० मिनीटांनी पोहचेल. या एक्सप्रेसला कराड,सातारा व लोणंद थांबा देण्यात आलेला आहे.

मंगळवारी लोणंद सकाळी साडेनऊला, साताऱ्याला १० वाजुन ४२ मिनीटांनी तर कऱ्हाडल ११ वाजुन ५० मिनीटांनी पोहोचणार आहे. त्यानंतर दुपारी हीच गाडी मिरजेतून सव्वादोनला सुटणार असुन कराडला तीन वाजुन ३० मिनीटांनी, साताऱ्याला चार वाजुन ३८ मिनीटांनी, लोणंदला पाच वाजुन ४० मिनीटांनी, पुण्याला रात्री आठ वाजुन १० मिनीटांनी, कल्याणला दहा वाजुन १० मिनीटांनी, भिंवडीला रात्री अकरा वाजुन २० मिनीटांनी, सुरतला पहाटे तीन वाजुन २३ मिनीटांनी, वडोदराला पाच वाजुन १५ मिनीटांनी, आमदाबादला सकाळी सात वाजुन २५ मिनीटांनी, आबु रोडला सकाळी साडेअकरा वाजता, फाळणा येथे १२ वाजुन ५५ मिनीटांनी, मारवाड जंक्शनला दुपारी दोन वाजता, जोधपुरला तीन वाजुन ४० मिनीटांनी, मेडता रोडला साडेपाच वाजता आणि बिकानेरला रात्री आठ वाजुन ४० मिनीटांनी पोहचणार असल्याचे तिवारी यांनी यावेळी सांगितले.