कराड प्रतिनिधी । पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील बेलवडे हवेली गावच्या हद्दीत दोन ट्रकची धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना रविवारी घडली. या अपघातात ट्रकचालक गंभीर जखमी झाला असून अपघातानंतर ट्रकच्या केबिनमध्ये ट्रकचालक अडकून पडला होता. त्यास नागरिक व पोलिसांनी बाहेर काढले. दरम्यान, अपघातानंतर सुमारे तासभर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बेलवडे हवेली गावच्या हद्दीत कोल्हापूर ते पुणे लेनवर पाठीमागून येणाऱ्या ट्रकची दुसऱ्या ट्रकला धडक बसली. धडक भीषण असल्याने ट्रकच्या केबिनचा चक्काचूर होऊन चालक केबिनमध्ये अडकून पडला होता.
पोलीस व स्थानिक नागरिकांनी चालकास बाहेर काढून कराड येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघातानंतर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. बेलवडे हवेली हद्दीत सद्यस्थितीत महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू असून त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.