बांधकाम विभागाची सर्व कामे दर्जेदार करा; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

0
5

सातारा प्रतिनिधी | मुंबई येथे मंत्रालयात बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या पदाधिकार्‍यांनी विविध मागण्यांसंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राज्यात विविध विकासकामे केली जातात. यामध्ये रस्त्यांसह विविध नागरी सुविधा, शासकीय, निमशासकीय इमारतींचे बांधकाम आदी कामांचा समावेश असतो. सर्व प्रकारची कामे दर्जेदार व्हावीत यासाठी सर्व अधिकारी आणि संबंधित सर्व घटकांनी जातीने लक्ष घालावे, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केल्या.

यावेळी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंद गुप्ता, राष्ट्रीय सचिव मोहिंदर रिजवानी, माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश पाटील, माजी राज्याध्यक्ष सचिन देशमुख, दत्ताजी मुळे, मंगेश जाधव, अजय गुजर, अभय चौक्शी, रमेश शिरसाट, प्रशांत सोंजे, सयाजी भोसले, अनुप शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी झालेल्या बैठकीस बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) एस.एस. साळुंखे, एस. डी. देशपुते व इतर अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बिल्डर्स असोसिएशनच्यावतीने नवीन दरपत्रक लागू करणे, थकीत बिले अदा करणे, मुदतवाढीच्या नियमांमध्ये सुधारणा करणे आदी मागण्या करण्यात आल्या. सर्व मागण्या सोडवण्याबाबत मंत्री शिवेंद्रराजे यांनी सकारात्मकता दर्शवली. दरम्यान, राज्याच्या विकासामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचा सिंहाचा वाटा असतो. त्यामुळे या विभागामार्फत होणारी सर्व प्रकारची कामे दर्जेदार झाली पाहिजेत, अशा सूचना मंत्री शिवेंद्रराजे यांनी अधिकार्‍यांना केल्या.